पुणे दि.20- जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण, पुणे व फेअर ट्रायल फेलोशिप प्रोग्राम, एनएलयू दिल्ली तसेच पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अशोका हॉल येथे जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय महेंद्र महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश के. पी नांदेडकर, एस. जी. वेदपाठक व ए. एस. वाघमारे, फेअर ट्रायल फेलोशिपच्या ऑपरेटिंग डायरेक्टर श्रीमती मेधा देव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे पुरस्कार प्राप्त ‘चिरभोग’ ही लघुचित्रफीत दाखवून करण्यात आली.
यावेळी न्या.महाजन यांनी मार्गदर्शन करतांना समाजातील भेदभाव दूर करण्याविषयी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सचिव श्रीमती पाटील यांनी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी ‘एससी-एसटी मित्र सेल’ स्थापन केल्याचे घोषित केले. सेलच्या कामकाजाची जबाबदारी ॲड.के. एन. पुजारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एससी-एसटी मित्र सेलमार्फत नागरिकांना मदत हवी असल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी श्रीमती पाटील यांनी केले.
‘सामाजिक न्याय’ या विषयावरील समूह चर्चेत ॲड. नीलिमा वर्तक ॲड. राहुल देशमुख व ॲड. देवानंद शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.