पुणे, दि. २०: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त पुणे जिल्ह्यात ‘शिवगर्जना’ महानाट्याचे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी, प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे २४ ते २६ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वाजता आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे महानाट्य पाहण्यासाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्यानुसार या महानाट्याचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे.
जवळपास तीनशे कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्ष वापर, चित्त थरारक लढाया, रोमांचकारी प्रसंगातून खराखुरा निखळ आणि धगधगत्या इतिहासाची आठवण या महानाट्यातून होणार आहे. तीन तासात संपूर्ण इतिहासाचे दर्शन, नेत्र सुखद अतिषबाजी, लक्षवेधी दिग्दर्शन, मंत्रमुग्ध संगीत, नेत्रदीपक प्रकाशयोजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड ही या महानाट्याची वैशिट्ये आहेत.
अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराजांची हत्या, शिवजन्म, युद्ध कला व राज्य कारभाराचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सूरतची लूट, कोकण मोहीम, पुरंदरचा वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरेंचे बलिदान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा हे प्रसंग महानाट्यात समाविष्ट आहेत. महानाट्य पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.