शांताई संस्था आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम ; संपतराव पोळ व दि मुस्लिम जमात हुसेनशाह बाबा ट्रस्ट पुरस्काराचे मानकरी
पुणे : शांताई संस्था आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे शांताई जीवनगौरव, समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शांताई जीवन गौरव पुरस्कार संपतराव पोळ यांना तर, शांताई समाज भूषण पुरस्कार दि मुस्लिम जमात हुसेनशाह बाबा ट्रस्ट यांना प्रदान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण वाघमारे, प्रमुख पाहुणे येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी आमदार सुनील टिंगरे, जगदीश मुळीक, सुरेंद्र पठारे, गुर्मीत सिंह , अॅड. ट्रॅव्हर आयझॅक, नगरसेवक आयुब शेख, लता राजगुरू, पूजा आनद. शीतल सावंत, मझहर खान तसेच दि मुस्लिम जमात हुसेन शाह बाबा ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.
शांताई संस्थेचे बापू कांबळे , रश्मी कांबळे , अतुल साळवे , अमोल राजगुरू, अनिरुद्ध हळंदे, राजू गायकवाड, सागर ठेकळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात ८०० महिलांना साडीवाटप व २०० मुलांना टी-शर्ट वाटप करण्यात आले.
आमदार सुनील टिंगरे यांनी शांताई संस्था करत असलेल्या कामाचे कौतुक केले, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता संस्था गेली वीस वर्ष काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. संतोष पाटील म्हणाले, गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येण्याची गरज आहे, मुलांनी मोबाईलचा वापर कमी करण्याची गरज आहे, असेही सांगितले. शांताई संस्था आणि जानकी देवी संस्था यांचे कार्यपट दाखविण्यात आले. यानंतर निलेश बनसोडे व कलाकार यांनी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.