पुणे-पुणे पोलिसांनी तब्बल ११०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत. दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक परिसरात अर्थ केम लॅबोरेटरी या एमडी अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीवर,आणि विश्रांतवाडी च्या २ गोडाऊन वर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाई मध्ये तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो एमडी अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे उपस्थित होते.ड्रग्जच्या या गोरख धंद्यात राजकीय सहभाग नसल्याचा दावा पोलिसांनी केला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यात ड्रग्जचा साठा सापडल्याने शिक्षणाचे माहेरघर सांकृतिक राजधानी म्हणविल्या जाणाऱ्या पुण्यातील या धंद्याची पाळेमुळे कुठवर रुजली असतील याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही . या ड्रग्जचा व्यापार त्यात अडकलेले एजंट, विक्रेते यांच्या पर्यंत पोहोचून हा व्यापार पोलिसांना आता समूळ नष्ट करावा लागणार आहे.
याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई करत सुरुवातीला चार कोटींचे ड्रग जप्त केले होते .त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू करत विश्रांतवाडी येथे दोन गोदामांवर छापा टाकला.यामध्ये मिठाच्या गोदामात लपवून ठेवलेले 55 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर युद्ध पातळीवर तपास करत कुरकुंभ एम आयडीसीमधील एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीवर छापा टाकण्यात आला. येथे ५५० किलोच्यावर MDजप्त करण्यात आले आहे. यानंतर ही कंपनी अनिल साबळे नावाच्या व्यक्तीची असून त्याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा आणि विविध परदेशी व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात रासायनिक तज्ञ देखील सहभागी असून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. अंमली पदार्थांचा तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत आहे. या प्रकरणात आणखी अमली पदार्थ मिळून येण्याची शक्यता असून इतर ठिकाणी आरोपींनी कारखाने सुरू केले आहेत का यात देखील चौकशी करण्यात येत आहे.
