वाहतूक उपायुक्तांशी चर्चा-संयोजक, माजी आमदार मोहन जोशी
पुणे – विविध चौकांमध्ये होणाऱ्या ट्रॅफिक जॅम च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ मार्फत पाठपुरावा चालू असून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याशी चर्चा करण्यात आली, अशी माहिती ‘वेकअप पुणेकर’ चे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) दिली.
कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पुलाच्या पाडकामाआधी करण्यात आलेल्या प्रायोगिक वाहतूक बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ च्या निदर्शनास आणून दिल्या. मंगलदास रोड वाहतुकीसाठी एकेरी न ठेवता पूर्वीसारखीच दुतर्फा वाहतूक चालू ठेवावी, मोबोज हॉटेल चौकातील बॅरिकेड्स ताबडतोब काढण्यात यावेत, त्या चौकातील रसत्यांवर तीन ते चार ट्रॅफिक वॉर्डन दिवसभरासाठी तैनात व्हावेत, अशा उपाययोजना नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ला सुचविल्या होत्या. पोलीस उपायुक्तांकडे त्या सूचनांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली, असे मोहन जोशी यांनी सांगितले.
दहावी, बारावी आणि इतर वार्षिक परीक्षेनंतर पुलाचे पाडकाम करावे, अशीही सूचना नागरिकांकडून आली होती, ती ही उपायुक्तांकडे दिल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
ट्रॅफिक समस्येवर नागरिका़ंकडून ‘वेकअप पुणेकर’ मार्फत उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी स्वयंसेवी संघटना, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ यांना ‘वेकअप पुणेकर’ने एकत्रित आणले आहे. ट्रॅफिक प्रश्नातून पुणेकरांची लवकरात लवकर सुटका व्हावी, असा प्रयत्न असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
वाहतूक उपायुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत धैर्यशील वंदेकर, वीरेंद्र किराड, प्रथमेश आबनावे, प्रशांत सुरसे, संकेत गलांडे, किशोर मारणे, प्रा.यशराज पारखी, सचिन भोसले, पल्लवी सुरसे, विश्वजीत जाधव आणि अधिकारी वर्ग सहभागी झाला होता.

