पुणे: महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेच्या वतीने सातव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी हडपसर येथील साधना विद्यालयातील सभागृहात स. ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी कै. शांताराम भाऊशेट शहासने स्मृती जीवनगौरव पुरस्कार शेतकर्यांचे कैवारी पंढरी सितारामजी चंदनखेडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या संमेलनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन समंलनाच्या कार्याध्यक्षा अॅड. नंदिनी शहासने यांनी केले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी भारतीय इतिहास संशोधक समितीचे सचिव पांडुरंग बलकवडे व स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास पायगुडे हे असतील. उद्घाटक म्हणून पुण्याचे धर्मादाय सहआयुक्त सु.मु. बुक्के हे असतील. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे व शौर्यचक्र प्राप्त कर्नल सचिन रेंदळे (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच ज्येष्ठ साहित्यिक चंद्रलेखा बेलसरे, मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य भारत सासणे, रविंद्र बेडकिहाळ, विलास सिंदगीकर, शिक्षणतज्ज्ञ अनुराधा निकम आणि भाषा अभ्यासक संजय जगताप हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच समारोप सत्रात प्रसिद्ध साहित्यिक श्याम भुर्के यांचे मार्गदर्शन लाभणार आहे
संमेलनामध्ये एकूण ९ सत्रे असतील. त्यात राष्ट्रभक्तीतून महासत्तेकडे – जागतिक कीर्तीचे समुपदेशन महेश अभ्यंकर, अग्नीवीर योजनाः सेना दलातील संधी – कर्नल सचिन रंदाळे, मराठी भाषाः शैक्षणिक सुसंधी -संजय जगताप, कृत्रिम बुध्दीमत्ता आणि भाषा-तेजाली शहासने आणि राष्ट्रभक्ती व जगदगुरू तुकोबांचे पाईकीचे अभंग-देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने मार्गदर्शन करतील.
यावेळी २ हजार क्रांतिकाराकांच्या छायाचित्राचे प्रदर्शने, तसेच संपूर्ण प्रदर्शन व १० हजार क्रांतिकाराकांची माहिती असलेल्या देशभक्तकोशच्या डिजिटल आवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष देशभक्ती कोषाकार चंद्रकांत शहासने यांनी दिली.
पंढरी चंदनखेडे यांना कै. शांताराम भाऊशेट शहासने जीवनगौरव पुरस्कार
पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांनी कृषीक्षेत्रात एमएस्सी करून सुवर्णपदक मिळवले. बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरी केल्यानंतर त्यांनी ग्रामगीता, गोपालन व संवर्धन, गोरक्षण व कृषी साक्षरता या विषयांचा प्रचार व जनजागृती केली. त्यासाठी हजारो पुस्तके स्वतः विकत घेऊन शेतकर्यांपर्यंत पोहचविले. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना कै. शांताराम भाऊशेट शहासने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे.