युवा मिशन २०२४ ला पुण्यात प्रचंड प्रतिसाद…
पुणे दि. ११ फेब्रुवारी – येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच महत्वाचे धोरण राबवणार असल्याचे सांगतानाच आम्ही निवडणूकांसाठी राजकारण करत नाहीत तर युवकांसाठी काम करतो हे युवकांना वाटले पाहिजे. तुमच्याकडून चांगले प्रस्ताव आले तर त्याचा युवा धोरणात नक्कीच समावेश केला जाईल असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ‘युवा मिशन २०२४’ या महामेळाव्यात युवकांना दिला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
या युवा मिशन महामेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार चेतन तुपे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सुनिल टिंगरे, आमदार अमोल मिटकरी, आमदार निलेश लंके, आमदार सुनिल शेळके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे,पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, युवा नेते पार्थ पवार, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आदींसह पक्षाचे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
युवक म्हणजे सळसळतं रक्त… मेहनती… कष्ट करण्याची जिद्द त्यांच्यात असते. या वयात त्यांच्या डोळयात स्वप्न असते… ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन ही त्यांची ताकद आहे… बदलत्या काळानुसार बदलायला हवे… आपण जागृत राहण्याची आवश्यकता आहे असे मार्गदर्शनही अजितदादा पवार यांनी युवकांना केले.
विरोधात कोण बोलत असेल तर तात्काळ प्रतिक्रिया दिली पाहिजे पण त्यातून पक्षाची बदनामी होणार नाही किंवा कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोकशाही पध्दतीने खूप काही करता येते असेही अजितदादा पवार म्हणाले.
आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात आहोत. शिवसेनेसोबत आणि भाजपसोबत का गेलो त्यावर मी अनेकदा बोललो आहे. आता आपल्याला विकासावर भर द्यायचा आहे. एकाच धोरणावर अवलंबून न राहता समयसूचकता दाखवत पुढे जायला हवे असे स्पष्ट विचारही अजितदादा पवार यांनी मांडले.
राष्ट्रवादीने नेहमीच युवकांना पुढे येण्यास मदत केली आहे. आज २५ वर्ष पक्षाला झाली आहेत. आता आपण सिल्व्हर जुबली साजरी करणार आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची युवा शक्ती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यास कमी पडता कामा नये असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
बहुमताला आदर देऊन पक्षात काम केले पाहिजे. हीच खरी लोकशाही असते. युवक पदाधिकारी निवड करताना जातीपातीचा, नात्यागोत्याचा असता कामा नये तर सर्व घटकांना सहभागी करून घेतले पाहिजे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
२००४ रोजी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण का झाला नाही याच्या खोलात आता जायचे नाही पण आता बघितले की, सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होणार बोलत आहेत. पण पहिल्यांदा आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे असा सल्लाही अजित पवार यांनी युवकांना दिला.
एकटा अजित पवार आणि सोबतच्या फक्त इतर सहकार्यांनीच काम करायचे नाही तर आपण सर्व मिळून काम करायचे आहे. आपण भूमिका का घेतली हे पटवून सांगण्याची गरज आहे. वरीष्ठ समजून घेत नव्हते किंवा समजल्याचे फक्त दाखवत होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतला. ४५ आमदार पाठीशी उभे का राहतात याचाही विचार करायला हवा होता असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
जगात आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे. ते अठरा – अठरा तास काम करतात. त्यांच्याकडे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. ते शेतकऱ्यांना मदत करत आहेत. परकीय गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यांच्या व्हिजनचा फायदा महाराष्ट्राला करुन घ्यायचा आहे असेही अजित पवार म्हणाले.
तुम्ही समोर बसलेले राष्ट्रवादीचे भविष्य आहात. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो असलो तरी आपली विचारधारा कायम आहे. कुणाचे फोन आले तर हळवे बनू नका… चलबिचल तर अजिबात होऊ नका. मी तुम्हाला सारखा फोन करु शकणार नाही पण तुमच्या विकासासाठी नेहमीच काम करेन असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.
१२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘स्वराज्य सप्ताहा’ निमित्ताने राज्यातील नागरिकांना सहभागी होण्यासाठी अजितदादा पवार यांनी पत्र लिहिले आहे. त्याचे वाचनही त्यांनी केले. तर १२ फेब्रुवारी स्वराज्य सप्ताहात
घेतली जाणारी शपथ यावेळी युवा वर्गाला अजितदादा पवार यांनी दिली.
अजितदादा पवार यांच्या पाठीशी इतकी मोठी युवाशक्ती उभी रहात असेल तर जुन्या मित्रांनी व नेत्यांनी पुनर्विचार केला पाहिजे – छगन भुजबळ
राज्यातील युवक अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर जुन्या मित्रांनी व नेत्यांनी पुनर्विचार केला पाहिजे. ते का उभे आहेत याचा विचार केला पाहिजे असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवकांनी भूमिका घेतली की त्याची दखल सरकारलाही घ्यावीच लागते. आजचा जमाना तरुणांचा आहे. म्हणून तुमचं योगदान राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली असले पाहिजे. तुम्ही पक्षाचा पाया आहे हेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले.
आज युवा मिशन मेळाव्याला स्वयंस्फूर्तीने युवक आले आहेत. मात्र कर्जत- जामखेडचे जागतिक युवा नेते आहेत त्यांच्याकडे पेडवर्कर आहेत अशी कोपरखळीही छगन भुजबळ यांनी लगावली.
ही लोकशाही आहे. जेव्हा पक्षाचे लोक निर्णय घेतात तेव्हा त्यांच्यापाठी जावे लागते. अजित पवार यांच्यापाठी लोक आहेत म्हणुन त्यांना चिन्ह आणि नाव मिळाले आहे. आम्ही बरीच वर्षे पक्षासाठी काम केले म्हणून आमच्याकडे चिन्ह आणि नाव आले हे लक्षात घ्या. भाजपनंतर दोन नंबरवर ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादा पवार होते. म्हणून चिन्ह मिळाले आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत त्यात जीवतोड काम करायचे आहे. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा. खेकड्याच्या वृत्तीने काम करु नका हे मी सतत सांगत आलो आहे. एकमेकांना सहकार्य करा. विचारधारेवर टिका होत आहे मात्र शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारधारेवर आपण काम करत होतो आणि आजही तीच विचारधारा कायम आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेला विकासाचा रोडमॅप आहे त्यावर काम करत आहोत असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पहिल्यापासून भूमिका आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासंदर्भात कायदा येत आहे त्यालाही आमचा पाठिंबा असणार आहे. लहानसहान समाजाला घेऊन पुढे जावे लागणार आहे त्यावेळी विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. या सर्वांची शक्ती अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभी करायची आहे. शांततेतून सर्वांना घेऊन पुढे गेलात तर विजय आपलाच आहे हे लक्षात घ्या असे सांगत छगन भुजबळ यांनी ‘मत सोच तेरा सपना पुरा होगा की नही’ … जितना संघर्ष बडा होता है उसके जीवनमे अंधेरा आता नही…अशा शायरीने भाषणाचा समारोप केला.
पुढच्या कालावधीत दादांच्या बाबतीत कुणी चुकीचा शब्दप्रयोग केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम करा -सुनिल तटकरे
अजितदादांवर टिका करण्याची मोहीमच पैसे टाकून, पैसे देऊन सोशल मिडियाच्या माध्यमातून केली जात आहे. टिकाटिप्पणी करताना भान सोडून बोलत आहेत. दादांवर टिका करण्यासाठी काही पगारी माणसं ठेवली गेली आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना मी सन्मान देतो पण त्यापेक्षा खालच्या स्तरावरील जे पदाधिकारी आहेत ते एकेरी भाषेत दादांना बोलत आहेत. येत्या पुढच्या कालावधीत यापध्दतीने दादांच्या बाबतीत कुणी शब्दप्रयोग केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम करा असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी युवकांना केले.
एका बाजूला यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे अश्लाघ्य शब्दात टिकाटिपण्णी करायची याच पुण्यनगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अजितदादा पवार यांच्यामुळे उभे राहिले नाहीतर ते कधीच उभे राहिले नसते. केवळ आणि केवळ अजितदादा पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादीची कार्यालये उभी राहिली आहेत असे ठणकावून सांगतानाच ५३ पैकी ४३ आमदारांचे पाठबळ अजितदादांना का मिळाले. केवळ सत्तेसाठी नाही तर या आमदारांच्या पाठीशी सख्ख्या भावासारखी २५ वर्ष पाठराखण केली आहे. तरुण आमदार निवडून आणले. ही सगळी फळी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
पक्षाला २५ वर्षे झाली. या वर्षात आपण सगळेच साक्षीदार आहोत. पण २५ वर्षाच्या इतिहासात ‘घड्याळ तेच वेळ नवी’ अशी बिरुदावली घेऊन पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवा शक्ती एकत्र आली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले.
ऐतिहासिक निर्णय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला अनेक प्रश्न निर्माण करण्याचे काम झाले पण मला विश्वास वाटत होता की, गेली पस्तीस वर्षे अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणात कणखरपणाची भूमिका बजावत पक्षाला ताकद देण्यासाठी झोकून देऊन काम करत होते त्यामुळेच अजितदादा तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
लोकशाहीच्या माध्यमातून आणि बहुमताने आम्ही एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना महाराष्ट्राला विकसित करावे… अधिक प्रगतीपथावर न्यावे…युवकांचे, महिलांचे प्रश्न सोडवावे यासाठी सत्तेचा आधार घेत सत्तेसाठी नव्हे तर बहुजनांच्या व्यापक हितासाठी काम करावे हा क्रांतिकारी निर्णय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. त्यामुळे सहा महिन्यात झालेला बदल आपण बघत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
कायद्याच्या कसोटीवर स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. काहीजण टिका करतात अदृश्य शक्तीचा हात पाठीमागे आहे. नैराश्यातून माणसाची मनं ज्यावेळी झपाटतात त्यावेळी कुणावर तरी दोष देण्याची परिस्थिती निर्माण होते असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.
२०१९ मध्ये भाजपसोबत जायचं ठरलं होतं परंतु शीर्षस्थ नेतृत्वाने निर्णय बदलला मात्र भाजपला दिलेला शब्द पाळण्यासाठी ‘शब्दाचा पक्का’ म्हणून ओळख असलेल्या अजितदादांनी ती शपथ घेतली व राजकीय सर्वस्व पणाला लावले असा गौप्यस्फोटही सुनिल तटकरे यांनी यावेळी केला.
अजितदादा पवार यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर आता आपल्याला ही जबाबदारी घेऊन काम करायचे आहे असे सांगतानाच अजितदादा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तुमच्यामुळे मी फिरू शकलो याचा अभिमान असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
आता महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांवर चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी उभे राहायचे आहे. त्यासाठीच ही युवकांची शक्ती एकत्रित आली आहे. २५ हजारांची ही शक्ती एका हाकेसरशी दादांच्या पाठीशी उभी राहिली आहे. तुम्ही प्रत्येकजण शंभराजणांशी संपर्क केलात तर पंचवीस लाख युवकांपर्यत पोचू शकाल आणि पंचवीस लाखातील प्रत्येकाने चार युवकांशी संपर्क केलात तर महाराष्ट्रातील एक कोटी युवकांची ताकद अजितपर्व जे आपण नवीन पर्व घेऊन कामाला सुरुवात केली आहे त्याच्यापाठीमागे उभी राहिल. दाखवून देऊया या महाराष्ट्रात आता नवीन अजित पर्व सुरू झाले आहे ‘घड्याळ तेच वेळ नवी’ … त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत झोकून काम करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी युवा मिशन मेळाव्यात केली.
या युवा मिशन – २०२४ महामेळाव्याचे प्रास्ताविक युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले.
या मेळाव्यात आमदार सुनिल शेळके, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले विचार मांडले.