पुणे-मोठ्या कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसी खाक्या दाखविण्याची मोहीम पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी सुरु केल्याने पुणेकरांना हायसे वाटू लागले आहे. आता वेगाने भरधाव ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे स्पॉट शोधून त्यांच्यावरही जोरदार कारवाई करावी. आणि अशा कारवाया तात्पुरत्या न राहता कायमस्वरूपी व्हाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागांत कारवाई करून ५७१ बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई केली असून, सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या सायलेन्सरवर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले.अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हददीत मोटर सायकलच्या विशेषतः बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून अनेक वाहनचालक मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करत आहेत. तसेच शहरातील अनेक वस्त्यांमध्ये दिवसा किंवा रात्री असे फेरबदल केलेले सायलेन्सर असलेले वाहन वापरून कर्णकर्कश आवाज करून ध्वनी प्रदूषणात भर टाकत आहेत. अशी मोटरसायकल चालवणारे वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण पुणे शहरात विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
दि. ०८/०२/२०२४ व दि. ०९/०२/२०२४ रोजी वाहतूक पोलीसांनी फेरबदल केलेले सायलेन्सर असलेले मोटर सायकल वाहनचालकांवर कारवाया करून एकूण ५७१ मोटार सायकलवर कारवाई करून सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहेत. यामध्ये विमानतळ, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, डेक्कन, भारती विदयापीठ तसेच हडपसर वाहतूक विभागांत सर्वात जास्त कारवाया करण्यात आल्या आहेत.
तरी पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पुणे शहर आयुक्तालयाचे हददीत अशा फेरबदल केलेल्या सायलेन्सर लावलेल्या मोटरसायकल चालवताना वाहनचालक आढळून आल्यास त्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेच्या व्हॉटसअॅप क्र. ८०८७२४०४०० यावर वाहन क्रमांक व लोकेशनसह कळवावी. त्यांचेवर कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा प्रकारचे सायलेन्सर विकणा-या दुकानदारांवर सुध्दा कारवाई करण्यात येईल.असेही उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी म्हटले आहे.