पुणे- सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकणे त्यानंतरही पोलिसांचे न ऐकणे पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करणे अशा घटना आणि पुण्याची वाहतूक समस्या काल पुण्यात वागळे यांच्या मोटारीवर हल्ला होण्याच्या घटनेमागे कारणीभूत असल्याची ‘थोडक्यात’ टिप्पणी करत पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
PUNE CITY पोलीस PRO च्या माध्यमातून PRO API. Sunil Nigudkar यांच्या मार्फत पुणे पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण वाचा जसेच्या तसे पोलिसांच्याच शब्दात …
पुणे शहर पोलीस प्रेस नोट : 09 फेब्रुवारी 2024 ची घटना
1.श्री.निखिल वागळे यांनी सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे पुण्यात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.
2.श्री.निखिल वागळे यांचे पुण्यात आगमन झाल्यावर त्यांचे मुक्कामाचे ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार पोहोचले,पुणे शहरात त्यांचेविरूध्द निर्माण झालेल्या तणावपुर्ण वातावरणाची माहिती त्यांना दिली. आणि त्यांना सांगितले की,पोलीस सुचना देत नाही तोपर्यंत आपण कार्यक्रमस्थळी जाऊ नका, कारण कार्यक्रम स्थळाच्या आजूबाजूला मोठया संख्येने आंदोलक जमा झालेले आहेत. आंदोलनकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असुन,ती पूर्ण झाल्यानंतरच आपण कार्यक्रमाचे ठिकाणी जावे असे त्यांना सांगितले होते.
3.सायंकाळी 06/00 वाजेपावेतो अंदाजे 25 आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते आणि काही लोकांना ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू होती.
4.श्री.निखिल वागळे यांनी कार्यक्रमाचे ठिकाणी जाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी पोलीसांनी त्यांना कार्यक्रमाचे ठिकाण सुरक्षित करणे आवश्यक आहे. तोपर्यंत आपण त्याठिकाणी जावु नये असे त्यांना पोलीसांतर्फे सुचविण्यात आले. तरीदेखील त्यांनी कार्यक्रमाचे ठिकाणी जाण्याचा आग्रह धरला. कार्यक्रमाचे ठिकाणी झालेल्या आंदोलकांचे गर्दीमुळे रस्त्यावरती वाहतुकीचा मोठा ओघ होता. त्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रीया ही धीम्या गतीने होत होती व अशा परिस्थितीत पोलीसांना बळाचा वापर करणे कठीण होत होते.
5.पोलीसांनी त्यांना सुचना देऊनही ते कार्यक्रमाचे ठिकाणी पोलीसांचे सुचनांचे विरूध्द रवाना झाले. रस्त्यात त्यांनी पोलीसांचे वाहनांना चकमा देवुन मार्ग बदलुन निघाले, असे असले तरीही पोलीस दलातील साध्या वेशातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे त्यांचे वाहनाचा पायी पाठलाग करून आंदोलकांपासुन त्यांना सुरक्षित ठेवत होते.
- कारवर हल्ला झाला तेव्हा आंदोलक आणि श्री.निखिल वागळे यांचे गाडीचे मध्ये त्यांचे सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस होते. परंतु सदर ठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आणि तेथील पादचारी व बघ्यांमुळे श्री.निखिल वागळे आणि त्यांचे गाडीला अशा परिस्थितीत बळाचा वापर करून,तात्काळ बाहेर काढणे शक्य होत नव्हते.
7.घटनेत सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध दंगल, मालमत्तेचे नुकसान इत्यादी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेची प्रक्रिया सुरू झाली असून, पुणे शहर पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.