ठाणे, दि. 09 :- राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमीपूजन व “मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा” (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ आज हॉटेल टिप-टॉप प्लाझा येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे एम.डी. श्री.मल्लिकनेर, स्थानिक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआय मध्ये क्रमांक 1 चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे. एमआयडीसीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 8 वी ते 10 वी च्या पाल्यांला दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. हा एक चांगला उपक्रम एमआयडीसीने राबविला आहे.
राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2 कोटी 8 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन त्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे, एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको, यासाठी सर्वजण काम करीत आहेत. स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी मधून गरजू रुग्णांना आतापर्यंत 2.5 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. गेले 16 महिने महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाल आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. ठाण्यात पार्किंगची व्यवस्था व्हावी व ट्रॅफिक पासून मुक्ती मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ व्हावे, हा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. यासाठी 34 कोटी रुपये खर्च करुन हे बहुस्तरीय वाहनतळ पूर्ण करण्यात आले आहे.
यावेळी मंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या काही पाल्यांना प्रातिनिधीक स्वरुपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी 8 वी ते 10 वी मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना टॅब वाटपाचे धोरण जाहीर करण्यात आले.औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना” (मेडीक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळा विषयी माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दिपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000000