पुणे-: ”शहरात आमच्यावर झालेल्या हल्ल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. मला ठार करायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माणसे पाठवली,” असा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला.
सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून हा भ्याड हल्ला झाला आहे. फडणवीस यांनी निषेध करण्याऐवजी हल्लेखोर कार्यकर्त्यांना अटक करून दाखवावी, तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
साने गुरुजी स्मारकाच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेनंतर वागळे पत्रकारांशी बोलत होते. वागळे म्हणाले, ”पोलिसांनी आम्हाला सभेला जाण्यापूर्वी ॲड. असीम सरोदे यांच्या घरी सुमारे चार तास नजरकैदेत ठेवले.
आमच्यावर हा हल्ला होणार हे पोलिसांना माहीत होते. आमच्या मोटारीवर चार-पाच ठिकाणी दगडांनी आणि काठ्यांनी हल्ला झाला. अंडी आणि निळी शाई फेकली. परंतु या घटनेमुळे आम्ही घाबरलेलो नाही. लोकशाही वाचविण्यासाठी जीव गेला तरी चालेल. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा भ्याड हल्ला झाला आहे.