पुणे- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत रत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने पत्रकार निखील वागळे यांना येऊ देणार नाही असा पवित्र वागळे यांची उद्या पुण्यात ‘निर्भय बनो’ अभियानांतर्गत सभा होत असतानाच भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी घेतल्याने पुणे पोलिसांच्या पुढे आव्हान निर्माण झाले आहे. विश्वंभर चौधरी , वकील असीम सरोदे आणि निखील वागळे यांच्या निर्भय बनो अभियानांतर्गत उद्या सायंकाळी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला परवानगी देऊ नये असे पत्र पोलिसांना घाटे यांनीम काल दिले आहे . मात्र आज त्यांनी या सभेला आमचा विरोध नाही मात्र वागळे यांना येऊ देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे.
पोलिसांना दिलेल्या पत्रात घाटे यांनी म्हटले आहेकी,’ देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्याबद्दल कायम अवमानकारक वक्तव्ये करणारे, देशाची माजी उपपंतप्रधान आदरणीय लालकृष्ण अडवाणी जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आडवाणी यांना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला शाबासकी देण्यासारखे आहे अशी आपल्या मनातील मळमळ ओकून समाजातील वातावरण कलुषित करणारे काही नतद्रष्ट लोक येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे ‘निर्भय बनो’ नावाची सभा घेणार आहेत.
गेल्या दहा वर्षात नरेंद्रभाई मोदी जी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाचा वेगाने विकास होतो आहे. जगभरात मोदी जींच्या नावाचे कौतुक केले जात आहे. पण हे सगळं बघून काही लोकांच्या पोटात दुखते आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक देशातील घटनात्मक पदांवर असणाऱ्या नेत्यांची बदनामी या सभेच्या माध्यमातून केली जाते. या सभेत सहभागी होणारे वक्ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरूनही कायम गरळ ओकत असतात.
अडवाणी जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही या निवडक लोकांनी अत्यंत खालच्या पातळीवर उतरून देशातील या सर्वोच्च सन्मानाचा अनादर केला होता. त्याचबरोबर मोदी जी आणि अडवाणी जी यांचा अपमान केला होता.
निर्भय बनो सभेच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेणे एवढे एकच उद्दिष्ट आयोजकांचे आहे. भारतीय जनता पार्टी या स्वरुपाच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दुही माजवणाऱ्या प्रवृत्तींच्या कायमच विरोधात उभी राहिली आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही संस्कृती निर्भय बनोच्या नावाखाली रुजविण्याची वृत्ती यातील वक्त्यांकडून सुरू आहे. पण पुणे शहर भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही.
देशविघातक वक्तव्ये करणाऱ्यांना वेळीच आळा घालण्यासाठी आपण निर्भय बनो सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. देशात भयमुक्त वातावरण असताना चार टाळकी निर्भय बनो म्हणून आपला अजेंडा रेटत आहेत. त्यांचा हा अजेंडा उधळून लावल्याशिवाय पुणे शहर भारतीय जनता पार्टी शांत राहणार नाही.
आपण या पत्राची दखल घेऊन तातडीने पुढील कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.
अशा शब्दात शहर भाजपने पत्र दिल्याने आता निखील वागळे सभेला येणार काय ? आले तर भाजपच्या वतीने त्यांना विरोध कशा पद्धतीने होईल ?पोलीस काय भूमिका घेतील हे आता उद्याच समजणार आहे.