एका विशेष करारानुसार वी संपूर्ण मार्गावरील कॉलिंग बूथना नेटवर्क साहाय्य प्रदान करणार असून त्यामुळे आणीबाणीच्या वेळी सार्वजनिक कम्युनिकेशन सुविधा तातडीने उपलब्ध होऊ शकेल.
वी या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या ९५ किमी लांब एक्स्प्रेसवेवर संचार, कनेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक सुरक्षा सुविधा सहजपणे आणि तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत एक विशेष करार केला असून त्याअंतर्गत संपूर्ण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर इमर्जन्सी कॉलिंग बूथ उभारण्यात येणार आहेत. या करारानुसार वी सर्व कॉलिंग बूथ्सना नेटवर्क साहाय्य प्रदान करणार आहे. दर दोन किमी अंतरावर हे इमर्जन्सी कॉलिंग बूथ उभारले जाणार असून त्यामुळे काही आणीबाणी उद्भवल्यास राज्य महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी थेट सहज संपर्क साधणे प्रवाशांना सहजशक्य होईल.
एमएसआरडीसीसोबत करण्यात आलेल्या कराराचा एक भाग म्हणून वी प्रत्येक इमर्जन्सी कॉलिंग बूथवर नेटवर्क सुरळीतपणे राहील याची व्यवस्था करेल आणि मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील ग्राहकांना २४X७ सार्वजनिक सुरक्षा व संचार सेवा उपलब्ध करवून देईल. नेटवर्क सर्वत्र एकसमान राहावे आणि त्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी राज्य महामार्ग पोलीस नियंत्रण कक्ष व इमर्जन्सी कॉलिंग बूथ्समध्ये वी सिम असतील. उपकरणांची देखभाल करून तसेच प्रवाशांच्या चौकशी व तक्रारींचे तातडीने निवारण करून एमएसआरडीसी इतर बाबी सांभाळेल.
वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री रोहित टंडन म्हणाले, “मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे हा राज्यातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. आघाडीची टेलिकॉम कंपनी म्हणून एमएसआरडीसीसोबत भागीदारी करून जास्तीत जास्त जनतेला अखंडित कनेक्टिव्हिटी उपलब्ध करवून देताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. आज जवळपास सर्वच प्रवाशांकडे मोबाईल फोन असतात, पण काही आणीबाणी उद्भवल्यास कनेक्ट कसे करावे किंवा मदतीसाठी स्वतःचे लोकेशन कसे समजावून सांगावे हे बहुतेकांना माहिती नसते. काही आणीबाणीच्या प्रसंगात या इमर्जन्सी कॉलिंग बूथ्समुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत, वैद्यकीय स्थिती, अपघात आणि वाहने बिघडल्यास तातडीने, थेट संपर्क साधणे शक्य झाले.”
एमएसआरडीसी लिमिटेडचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेश पाटील यांनी सांगितले, “अतिशय महत्त्वाच्या अशा या सार्वजनिक सेवेसाठी वी सोबत सहयोग करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, भविष्यात ही भागीदारी खूप यशस्वी ठरेल याची आम्हाला खात्री आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला एमएसआरडीसीमध्ये आम्ही सर्वात जास्त प्राधान्य देतो. मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर सुरक्षित प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग हे इमर्जन्सी कॉलिंग बूथ आहेत. संपूर्ण मार्गावर स्थिर व सर्वोत्तम नेटवर्क अनुभव पुरवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार वी कडे आहेत.”