पुणे-निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचाच असा निर्वाळा दिला. पण या निर्णयामुळे माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी दिली. तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागतेय का? असा प्रश्न विचारल्यावर, माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसेच बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाचा चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही, असं म्हणत पाटलांनी अजित पवारांच्या दाव्याला अप्रत्यक्ष आक्षेप नोंदविला आहे बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांनीही तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी हा मतदारसंघ कुणाला मिळणार यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचं सांगत आता अजित पवारांना एक प्रकारे राजकीय आव्हान उभे केल्याचे मानले जाणार आहे.बारामती मतदारसंघाचे नेतृत्व सध्या सुप्रिया सुळे करत असून त्याच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असं सूचक विधानही त्यांनी केले. तर त्यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावला.
राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आणि अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्या ठिकाणचा खासदार निवडून आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष देऊन गाठीभेटी घ्यायला सुरू केल्या.