मुंबई: जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असूनत्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला.
निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं.
निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्यानंतर शरद पवारांकडे दोन पर्याय आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर शरद पवार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.