कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील एका गुंडासोबतचा फोटो समोर आला आहे. खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करून महाराष्ट्रात गुंडा राज सुरू असल्याचा हल्लाबोल केला आहे.
संजय राऊतांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने…’ असे म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली आहे
सामान्य माणूस पोहोचू शकत नाही अशा कार्यालयात CM च्या भेटी थेट यांच्याशी होतातच कशा ?
मागील काही दिवसांपासून राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था पाहता सत्ताधारी नेतेच गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.सामान्य माणूस पोहोचू शकत नाही अशा कार्यालयात CM च्या भेटी थेट यांच्याशी होतातच कशा ?असा प्रश्न उपस्थित केला जातोय .
निलेश घायवळ पुण्यात गॅंगस्टर म्हणून ओळखा जातो. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे या सारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न असेही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी 2021 मध्ये त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात घायवळला स्थानबद्ध केले होते. आता त्याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्वीट करण्यात आले आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे या देशातील गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुंडाना पोसत आहेत. पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे (भाजप) आमदार गोळीबार करत आहेत, या सगळ्या विषयांवर पंतप्रधान मोदी काही बोलले का ?त्यावर त्यांचं मौन का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. देशातील समस्यांवर मोदी काहीच बोलले नाही. तासाभराच्या भाषणात निम्मा वेळ तर मोदी फक्त काँग्रेसवर टीका करत होते. नेहरू, इंदिरा गांधीवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा असा सल्ला देत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.
आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली. त्यातच
खासदार श्रीकांत शिंदे यांना पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
रोज एक फोटो ट्विट करणार, राऊतांचा इशारा
‘वर्षा’बंगल्यावर, मंत्रालयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या येऊन भेटत आहेत. खून, दरोडे , अत्याचार अशा गुन्ह्यांसाठी आत असलेले, जामीनवर बाहेर आलेले हे गुंड आणि त्यांच्या टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतात ? त्या गुंड टोळ्यांचा वापर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आपले मुख्यमंत्री करणार आहेत का ? असा उपरोधिक सवालही राऊत यांनी विचारला. अजित पवारांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गुंडांची रांग लागली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत. आज मी एक फोटो टाकलाय,तसा मी रोज टाकणार आहे असा इशाराही राऊत यांनी दिला. मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी या गुंडांच्या बैठका घडवून आणतो आहे, याचा लवकर मी पर्दाफाश करणार आहे, असंही त्यांनी सुनावलं.
भाजपकडेसुद्धा एकच प्रॉडक्ट, त्यांच्याकडे मोदींशिवाय दुसरं काही आहे का ?
हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे. चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाने केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहून तुम्हाला सत्य कळेल. भाजपकडे सुद्धा एकच प्रॉडक्ट आहे, त्यांच्याकडे मोदींशिवाय दुसरं काही आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून नरेंद्र मोदी पंतप्रधान कार्यालयात बसले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.