अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची घोषणा
पिंपरी, पुणे (दि.३ फेब्रुवारी २०२४) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठानच्या सहयोगाने व सिद्धिविनायक ग्रुप पुरस्कृत यंदाचा ‘आशा भोसले पुरस्कार’ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार शान यांना देण्यात येणार आहे. नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, प्रमुख कार्यवाहक सुहास जोशी, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सदस्य नरेंद्र आमले आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, रविवारी (दि. ११ फेब्रुवारी २४) सायंकाळी ५:३० वाजता, कामगार कल्याण मैदान, भोईर नगर, चिंचवड येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारांना आशाजींच्या वाढदिवशी म्हणजे आठ सप्टेंबरला हा पुरस्कार जाहीर केला जातो. यापूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अन्नू मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरि हरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी अशा दिग्गज संगीतकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शान यांनी आजवर केलेल्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शान यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख अकरा हजार रुपये रोख, शाल व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शान यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य सादर केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.