मुंबई–भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड हे गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली असून त्यांना कोर्टासमोर सादर केले तेव्हा आज कोर्टाने तिघांना 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीपर्यंत या तिघांची पोलिस कोठडीत चौकशी होणार आहे.
न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं. पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली, त्यानंतर कोर्टाने त्यांचा निकाल हा राखून ठेवला होता. पण आता गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटात आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.
सुरक्षेच्या कारणाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार गायकवाड व त्यांच्या साथीदारांना न्यायालय़ात सादर केले जावे, अशी मागणी पोलिसांनी केली होती. परंतु, कोर्टाने त्यांची मागणी मान्य केली नाही. अखेर त्यांना कोर्टात सादर करावे लागले. पोलिसांकडून 15 दिवसांची पोलिस कोठडी मागितली जात आहे. तर त्यांना कमीत कमी पोलिस कोठडी दिली जावी, अशी मागणी आरोपींच्या वकीलांकडून केली .
या गोळीबारानंतर उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी गोळीबार व हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना त्यांना कळवा येथील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना न्यायालयात हलवण्यात आले. या प्रकरणी आणखी 3 आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा
दुसरीकडे, गणपत पाटील यांनी आपण आत्मसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा केला आहे. मी 10 वर्षापूर्वी एक भूखंड घेतला होता. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. ते कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता, असे गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे. काल सायंकाळी महेश गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलिस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला मारत असतील, तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, असे ते म्हणाले.