मुंबई-वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या 6 जागांसाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. या 6 जागांमध्ये पुणे, अकोला, अमरावती, सोलापूर, मुंबई दक्षिण मध्य व परभणी या जागांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकरांनी खरेच 6 जागांचा प्रस्ताव ठेवला असेल तर मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. या प्रकरणी विरोधकांच्या या आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांची तिसरी बैठक शुक्रवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात पार पडली. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा झाली. पण सूत्रांच्या माहितीनुसार, मविआत नव्याने सहभागी झालेली वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या 6 जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे मविआतील जागावाटपाचा तिढा अजून क्लिष्ट होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत नुकताच प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर शुक्रवारी मुंबईत झालेल्या मविआच्या बैठकीला हजर राहिले. या बैठकीत त्यांनी वंचितने मविआपुढे ठेवलेल्या अजेंड्यावर चर्चा केली. तसेच कोणत्याही स्थितीत केंद्रातील सत्ताधारी एनडीएला रोखण्याचा संकल्प व्यक्त केला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी तसे बोलूनही दाखवले. पण त्याचवेळी विरोधकांची इंडिया आघाडी अस्तित्वात नसल्याचा आरसाही त्यांनी काँग्रेसला दाखवला.
दुसरीकडे, मविआतील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण 48 पैकी 34 जागांचा तिढा जवळपास सुटला आहे. पण उर्वरित 14 जागांवर चर्चा सुरू आहे. या प्रकरणी तिन्ही घटकपक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता वंचितचा आघाडीत समावेश झाल्यामुळे हा तिढा अधिकच वाढण्याची शक्यता आहे.असे सूत्राकडून समजते आहे.