महाराष्ट्राच्या धर्तीवर देशातील महिला उद्योजकांसाठी धोरण राबविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
पुणे दि.१: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे देशातील जनतेच्या विकासाकरिता मोठं ध्येय ठरवतात आणि ते पूर्ण देखील करत असतात. त्यांच्या राजकीय ईच्छाशक्तीतुन मोठ्या योजना व प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना मिळत आहे. देशातील महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर महिला उद्योजक धोरण राबविण्यात यावे याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. असे विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया देताना सांगितले.
आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर डॉ. गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ट्रिपल तलाक अवैध ठरवणं, संसद व स्थानिक सभागृहांमध्ये एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवणं या निर्णयांमधून महिला सबलीकरणावर सरकारन भर असल्याचं दाखवून दिलं आहे. उच्च शिक्षणात महिलांचा समावेश १० वर्षांत २८ टक्क्यांनी वाढला आहे. एसटीईएम अभ्यासक्रमांमध्ये मुली व महिलांचा सहभाग ४३ टक्के असल्याने डॉ. गोऱ्हे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुढील ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधली जाणार आहेत. यातील ७० टक्के घरे ही महिलांच्या मालकीची आहेत. हे खूप महत्वाचे असल्याचे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे मोठे प्रकल्प सुरू केले त्याचे लोकार्पणसुद्धा श्री मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केले आहे. अनेक ठिकाणी सुरू केलेल्या कामांबाबत आपल्याला कश्मीर पासून ते ईशान्य भारतापर्यंत आणि तिथपासून ते मुंबईच्या अटल सेतूपर्यंत अनेक उदाहरणं आपल्याला दिसत आहेत.
त्याचबरोबर वैचारिक पातळीवर ज्या संकल्पना मांडल्या होत्या त्यापैकी त्यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. त्यात पाहिला गेले तर महिला आरक्षण विधेयक त्याचबरोबर यावेळेस अर्थसंकल्प तो नारी, गरीब समाज, युवा आणि शेतकरी यांच्यासाठी म्हणून समर्पित केलेला आहे. त्यामधून देखील त्यांची भूमिका स्पष्ट होते आहे.
मोफत धान्य मिळणं, त्याचबरोबर पायाभूत सुविधांना चालना, कर्ज मिळण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या बेरोजगारांच्यासाठीचे मेळावे, स्टार्टअपचे उद्योग यामधून सुद्धा आपल्याला महाराष्ट्राचे आणि भारताचे चित्र बदलताना दिसत आहे.