पुणे- भारतीय जनता पार्टीचा विरोध करणाऱ्या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना विविध केंद्रीय यंत्रणांकडून कारवाईचे नाटक करून त्रास दिला जात आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी म्हटले कि,’ नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या तालावर नाचणाऱ्या ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या केंद्रीय यंत्रणांकडून विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना निष्कारण त्रास दिला जात आहे. विरोधी पक्षातील जे नेते भाजपच्या मांडीवर जाऊन बसतील त्यांना रोज क्लीन चिट मिळते, तर भाजपच्या हुकूमशाही विरोधात जे संघर्ष करतात अशा नेत्यांना केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून त्रास दिला जातो हे चित्र संपूर्ण देश बघत आहे. एक आठवड्यापूर्वी भ्रष्टाचारी असणारे नितीश कुमार भाजपसोबत जाताच पवित्र झाले तर भाजप सोबत संघर्ष करणारे हेमंत सोरेन यांना ईडी अटक करते,ही बाब आपण सगळे बघत आहोत. महाराष्ट्रातही भाजपच्या हुकूमशाही विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील व युवा नेते आमदार रोहित पवार यांना सातत्याने केंद्रीय यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरत असताना जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना नाहक त्रास देऊन भाजप सरकार हुकूमशाहीचा काळा अध्याय रचत आहे. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात आले. “मोदी-शहा हाय हाय, हुकुमशहा सरकार मुर्दाबाद, वारसा आमचा संघर्षाचा ,अन्यायाच्या विरोधात लढण्याचा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. सरकारच्या निषेधाचे निवेदन उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे सुपूर्द करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणारा त्रास थांबवावा अन्यथा देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष प्रशांत जगताप, माज़ी आमदार श्री. जगन्नाथ शेवाळे, किशोर कांबळे, डॉ. सुनील जगताप, मृणालिनी वाणी, विक्रम जाधव , शेखर धावडे, नरेश पगडालू, रोहन पायगुडे, रमीज सैयद, पूजा काटकर, समीर पवार, रूपाली शिंदे, स्वाती चिटणीस, रवि कळमकर, प्रवीण आल्हट, तन्वीर शेख, अजिंक्य पालकर, आसिफ शेख, प्रवीण तुपे, फाईम शैख़ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.