गुडलक चौक येथे NEET चा प्रतीकात्मक पुतळा जाळून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी.
पुणे : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET परीक्षेतील सततच्या गैरव्यवस्था, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे आज गुडलक चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी NEET चा प्रतीकात्मक पुतळा जाळून केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीची खिल्ली उडवणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेचे पूर्णपणे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करत युवक काँग्रेसने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले,
“देशातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून स्वतःचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मोदी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. NEET परीक्षा आता गुणवत्तेची नसून भ्रष्टाचाराची परीक्षा बनली आहे. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.”
युवक काँग्रेसचे राज्याचे मीडिया विभाग अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले,
“जे सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, ते देशाचे भविष्य काय सुरक्षित ठेवणार? विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख करणाऱ्या या सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर बुलडोझर चालवणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही.
प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश अबनावे म्हणाले,
“विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता देशभरातील विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरतील. NEET घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
या आंदोलनात प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रथमेश अबनावे, मोहसीन शेख, भूषण रानभरे, सौरभ अमराळे, अंजनेय साठे, अथर्व सोनार, सद्दाम शेख, अभिषेक अवचार, निखिल मलके, सागर धाडवे,ओंकार मोरे, विशाल कामेकर, दिनेश सरताळे, विकास सुपनार, अँड सूरज, प्रसन्न मोरे, तेजस बनसोड आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक विद्यार्थी उपस्थित होते.

