दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला ठसा आईवडिलांच्या कष्टातून प्रेरणा घेत परीक्षा दिलेल्या पैकी ८४ % विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.
पुणे- कचरावेचकांच्या मुलामुलींनी १० वी च्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून सामाजिक पूर्वग्रह, आर्थिक अडचणी, अभ्यास करायला जागेची कमतरता आणि आसपासचे पोषक नसलेले वातावरण सारख्या आव्हानांना चपखल उत्तर दिले आहे.
परीक्षा दिलेल्या एकूण १९९ विद्यार्थ्यांपैकी १०९ मुलांनी आणि ९० मुलींनी यंदा १० वी ची परीक्षा दिली. यामध्ये शिक्षण अपूर्ण राहिलेल्या ११ जणांनी १७ नंबर फॉर्म भरून जिद्दीने बाह्य स्वरूपात परीक्षा दिली. त्याचबरोबर, ३ कचरावेचकांनी देखील यावर्षी आपले दहावी पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण केले. सकाळी घरोघरी कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या, कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या स्वच्छ च्या महिला कचरावेचकांनी देखील संस्थेच्या आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या मदतीने मुलांसोबत दहावी देऊन यश मिळवले.
कचरावेचकांच्या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेतर्फे कचरावेचकांच्या पाल्यांना या महत्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर आर्थिक सहाय्यासाठी शिष्यवृत्ती, योग्य मार्गदर्शनासाठी शिकवणी, अभ्यास करण्यासाठी व परीक्षेसाठी वह्या व स्टेशनरी सारखी मदत वर्षभरात करण्यात आली. त्याचबरोबर, आता थांबायचं नाय या चित्रपटाचा विशेष शो देखील कचरावेचक व त्यांच्या पाल्यांसाठी संघटनेने आयोजित केला होता. सफाई कामगारांनी दहावी पास केल्याची कहाणी दाखवणाऱ्या या चित्रपटातून अनेकांनी प्रेरणा घेत यंदा दहावीची परीक्षा दिली.
चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा या ओळी मुलामुलींनी आपल्या आईवडिलांप्रमाणेच प्रत्यक्षात आणल्या आहेत. शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने आपला पुढचा मार्ग स्वतः घडवण्याच्या प्रवासाची दमदार सुरुवात कचरावेचकांच्या पाल्यांनी या निकालातून केली आहे.
मुलांना शिक्षणात मदत करताना स्वतः १० वी पास केली; स्वच्छ च्या कचरावेचक महिलांची प्रेरणादायी कहाणी
सकाळी घरोघरी जाऊन कचरा घेतला, रात्री जागून अभ्यास केला, स्वच्छ च्या ३ कचरावेचक महिलांनी १० वी पास केली.
नाव: वर्षा ओव्हाळ
गुण: ४६%
मागच्या वर्षी मे महिन्यात संघटनेने आता थांबायचं नाय हा सफाई कामगारांनी सर्व अडचणींवर मात करत १० वी पास केल्याची कहाणी दाखवणाऱ्या चित्रपटाचा विशेष शो कचरावेचकांसाठी आयोजित केला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर वर्षा ओव्हाळांनी निश्चय केला कि यंदा दहावी द्यायची आणि पास व्हायचंच. आपल्या दोन मुलांची पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या एकल माता असलेल्या वर्षा ताईंनी रात्रशाळेत जाऊन दहावीचा अभ्यास केला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, कागदपत्रांच्या अभावी परीक्षेस बसता येईल कि नाही अशी शंका असताना, वर्षा ताईंनी जिद्दीने अभ्यास केला आणि ४६% गुण मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले.
नाव: ज्योती पंडित
गुण: ४१%
स्वच्छ संस्थेतील कचरावेचक ज्योती अशोक पंडीत SRPF भागातील गावठाण भागात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करतात. याआधी ज्योती पंडित यांचे ७ वी पर्यंतच शिक्षण झालेले होते. २७ वर्षापूर्वी कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. स्वतःच शिक्षण अर्धवट राहिले तरी, आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिकवून उच्च पदावर व प्रशासकीय सेवेत जावे पाठवायचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी अथक परिश्रम घेऊन ज्योतीताईंनी आपली मुलगी श्वेता हिचे भारतीय नौसेनेत काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. तसेच आपल्या दोन्ही मुलांना त्या पोलीस व आर्मी मध्ये भरती होण्यासाठी मदत करत आहेत.
ज्योती ताई सांगतात, “मुलगी श्वेताचे (भारतीय नौसेना दल ) स्वप्न पूर्ण झाले. माझ्या मुलीने माझ्यासाठी स्वप्न पाहिले कि, मी यावर्षी दहावीची परीक्षा द्यावी. आणि तिला माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याने सर्व कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म तिनेच भरला. मला आमच्या स्वच्छ संस्था आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत मार्फत मासूम संस्थेच्या रात्रशाळेत प्रवेश मिळाला. यासाठी संघटनेतील अनेकांनी मला अडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केले. आम्हाला दाखवण्यात आलेली शिक्षणावरील फिल्म “आता थांबायचं नाही” हि माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती.
सकाळी कचऱ्याचे काम आणि संध्याकाळी शाळा असे माझे नियोजन होते. यासाठी माझ्या दोघ मुलांची व पतीची पण तेवढीच साथ मिळाली, असे ज्योतीताईंनी सांगितले. रात्रशाळेतून येण्यापूर्वी घरातील सर्व गोष्टी त्या आवरून ठेवत असत जेणेकरून अभ्यासाला वेळ मिळेल. या सर्वांच्या सहकार्याने मी आज ४१% मिळवू शकले. पुढे मी पण प्रशासकीय सेवेत जाऊन काम करावे असे स्वप्न असेल. त्या साठी पुढे जिद्दीने शिकणार आहे. आणि सोबत काम पण चालू ठेवणार आहे, अशा भावना ज्योतीताईंनी व्यक्त केल्या.
कचरावेचक आई आणि मुलाची दहावीच्या परीक्षेत यशस्वी भरारी
आईचे नाव: अर्चना घोडके
गुण: ६०%
मुलाचे नाव: यश घोडके
गुण: ५४%
शिक्षणाची आवड आणि मनात जिद्द ठेवून या आई-मुलाच्या जोडीने एकत्र दहावीची तयारी केली आणि दोघेही उत्तीर्ण झाले.
पुण्यातील स्वच्छ संस्थेतील कचरावेचक अर्चना विकास घोडके या SRPF, वानवडी भागात दारोदारी कचरा संकलनाचे काम करतात. २५ वर्षापूर्वी अर्चना यांचे आधी ९ वी पर्यंत शिक्षण झाले होते .परंतु कुटुंबाची पूर्ण जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु यंदा स्वतःचा मुलगा यश विकास घोडके १० वी ची परीक्षा देणार होता. यशला दहावीच्या तयारीसाठी मदत करणाऱ्या अर्चना ताईंना स्वतःला शिक्षणाची गोडी नव्याने लागली आणि त्यांनी देखील १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा देण्याचे ठरवले. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत व स्वच्छ संस्थेमधील सहकाऱ्यांनी शिक्षणासाठी प्रवृत्त केले असे अर्चना ताईंनी सांगितले. मासूम संस्थेच्या रात्र शाळेत प्रवेश घेवून ,सकाळी काम आणि रात्री अभ्यास करत अर्चना यांनी ६० % मिळवून यश संपादन केले आहे. आणि मुलगा यश याने ५४ % मिळवून स्वतःच्या नावाचा अर्थ प्रत्यक्षात उतरवला आहे.
मुलगा यश सांगतो कि ,मी स्वतः अभ्यास करायचो, तेव्हा आईला काही विषयांची अडचण आल्यास समजून सांगायचो आणि आम्ही दोघांनीही कुठला क्लास न लावता घरीच राहून अभ्यास केला. आई कामावरून आल्यावर संध्याकाळी रात्र शाळेत जायची तिथून आल्यावर जे शिकवले आहे ते मला सांगायची. यातून आमची अभ्यासाची गोडी वाढायची. कधी कधी मी झोपून जायचो पण आई अभ्यास करायची त्यामुळे कदाचित आईला माझ्यापेक्षा जास्त टक्के मिळाले असे यशने सांगितले.
कोणताही क्लास न लावता खुशी ने मिळवले ८९%
विद्यार्थ्याचे नाव : खुशी गणेश खुपटे
आईचे नाव: कावेरी खुपटे
गुण : 89%
Mobile: 8459695110
वस्ती – पाटील इस्टेट, शिवाजीनगर

मी कोणताही क्लास लावला नाही कारण माझा स्वतःचा स्वतः अभ्यास करण्यावर ठाम विश्वास आहे. माझी आई मला शक्य त्या सर्वप्रकारे माझ्या अभ्यासात मदत करते. आईच्या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने मला आर्थिक मदत केलीच, पण त्याबरोबर अडचणींवर लक्ष केंद्रित न करता माझे मनोबल वाढावे यासाठी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.
मी इतरही सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते कि मोटिव्हेशन व्हिडीओ पाहून मिळत नाही, प्रेरणा आपल्या आत असते जिचा आपण फक्त शोध घ्यायचा असतो.
पाटील इस्टेट, शिवाजीनगर इथे राहणाऱ्या कावेरी खुपटे कागद,काच,पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद आहेत. एकल माता असलेल्या कावेरी आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी फिरून कचरा गोळा करण्याचे काम करून सांभाळतात
विद्यार्थ्याचे नाव : सार्थक मेश्राम चंदनशिवे
आईचे नाव: साधना मेश्राम चंदनशिवे
गुण : 86.60%
Mobile: 9881895802
वस्ती – दांडेकर पूल, सिंहगड रोड.

साधना मेश्राम चंदनशिवे या मागील २ वर्षांपासून स्वच्छ संस्थेच्या सभासद आहेत. त्यांचे पती रोजगार पद्धतीने कष्टाची कामे करतात. आपल्या आईवडिलांच्या कष्टांचे चीज करत सार्थकने १० वी मध्ये तो ८६.६०% मिळवले. साधना ताईंचे कुटुंब अगोदर बार्शी या गावी राहत होते आणि दुसऱ्यांच्या शेतात अल्प रोजगारावर मजुरी करत होते. पण भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी चांगले उत्पन्न मिळावे याचा विचार करून त्यांनी गाव सोडले आणि पुण्यामध्ये राहायला आले.
विद्यार्थ्याचे नाव : तनू भारत तरकसे
सभासद नाव : भारत मुकुंद तरकसे
गुण : ८१.८%
Mobile: 7030713870
वस्ती: निगडी ओटा स्कीम, निगडी

तनू अत्यंत हुशार आणि जिद्दी मुलगी आहे. लहानपणापासूनच तिला शिक्षणाची आवड आहे ती तिच्याबरोबर तिच्या लहान भावाचा देखील अभ्यास घेत असते. तिचे वडील भारत तरकसे हे गेल्या ८ वर्षापासून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचे सभासद आहेत, ते पिंपरी चिंचवड भागात घंटा गाडीवर काम करतात.
वडिलांच्या कष्टाची मला जाणीव आहे आणि मी त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे, त्याकरिता मी खूप अभ्यास करीन आणि स्वप्न साकार करून दाखविन”, अशा भावना तनुने व्यक्त केल्या.
तनू चे वडील सांगतात, “संस्थेने केलेली मदत मौल्यवान आहे, वेळोवेळी केले गेलेले मार्गदर्शन, शैक्षणिक मदत यामुळे तनुच्या यशात खूप मोठा वाटा हा संस्थेचा आहे.”
विद्यार्थ्याचे नाव: सानिका उमेश अडसूळ
सभासद नाव: राणी उमेश अडसूळ
गुण: ७८%
Mobile: 7721809405
वस्ती :- गांधीनगर, पिंपरी

सानिका ने ८ वी पर्यंतचे शिक्षण पिंपरीतील इंटरनॅशन शाळेतून RTE मार्फत पूर्ण केले. परंतु आई ची परिस्थिती नसल्यामुळे तिला तिथून दाखला काढून प्रथमेश इंग्लिश स्कूल नेहरूनगर पिंपरी या ठिकाणी प्रवेश घेतला.
राणी उमेश अडसूळ या गेल्या १० वर्षापासून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद आहेत.
राणी अडसूळ या एकल माता असून त्यांच्या पतीचे २०१६ साली निधन झाले. त्यानंतर मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी हार न मानता सानिका चे माध्यमिक पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले.सानिका ने अथक प्रयत्न करून १० वी ची परीक्षा दिली त्यात भरघोस यश देखील संपादन केले.
सानिका ११ वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असून ती मेडिकल मध्ये करिअर करायचे आहे असे तिचे स्वप्न आहे. सानिका ला संस्थेमार्फत शैक्षणिक मदत वारंवार करण्यात आली तसेच तिला अतिरिक्त क्लास करिता देखील संस्थेमार्फत मदत करण्यात आली.
विद्यार्थ्याचे नाव – दिव्या विकास शिरसाठ
सभासद नावं – विकास शिरसाठ
गुण – ७५%
मोबाईल नंबर – 9049804881
वस्ती – पाटील इस्टेट, शिवाजीनगर

दिव्याने दहावीच्या परीक्षेची तयारी अत्यंत मेहनतीने आणि सातत्याने केली. ती नियमितपणे घरी अभ्यास करत असे तसेच वर्गात जाऊन अभ्यासातील शंका शिक्षकांना विचारून त्यांचे मार्गदर्शन घेत असे. मोबाईलपासून दूर राहून तिने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. तिची आजी व वडील दोघेही कचरावेचक म्हणून काम करतात.कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या मदतीने तिला दहावीचा क्लास लावण्यात आला, ज्याचा तिच्या अभ्यासाला मोठा फायदा झाला.
आजच्या विद्यार्थ्यांना ती एकच संदेश देते, “मोबाईलचा मर्यादित वापर करा, अभ्यासात सातत्य ठेवा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. मेहनत आणि चिकाटीमुळे यश निश्चित मिळते.”

