पुणे, दि. २९ जानेवारी २०२४: वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केल्यानंतरही चोरीने सुरू असलेला २ लाख ६८ हजार रुपयांच्या विजेचा वापर महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाच्या पथकाने उघडकीस आणला. या प्रकरणी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील दोन थकबाकीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मुळशी विभागातील उरुळी कांचन उपविभाग अंतर्गत मौजे कदमवाकवस्ती येथील चंद्रकांत शंकर रोकडे या ग्राहकाची वीजजोडणी १५ हजार ४२० रुपयांच्या थकबाकीमुळे डिसेंबर २०१८ मध्ये खंडित करण्यात आली. तसेच अविनाश विजय बडदे या वीज वापरकर्त्या ग्राहकाची जोडणी ५९ हजार ८० रुपयांच्या थकबाकीमुळे नोव्हेंबर २०२१ मध्ये खंडित करण्यात आली होती.
दरम्यान उरुळी कांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. धम्मपाल पंडित, सहायक अभियंता श्री. रामप्रसाद नरवडे तसेच श्वेता दळवी, सिराज सय्यद यांचे पथक थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची पाहणी करीत असताना या दोन्ही थकबाकीदारांकडे वीजचोरी सुरू असल्याचे मंगळवारी (ता. २३) आढळून आले. यानंतर पंचनामा करून वीजचोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. या दोन्ही ठिकाणच्या वीजचोरी प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चंद्रकांत शंकर रोकडे व अविनाश विजय बडदे विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.