व्ही मुरलीधरन,नारायण राणे व प्रकाश जावडेकर भाजपचे ३ निवृत्त
काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचीही जागा यंदा रिक्त
27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी सोमवारी निवडणुकीची घोषणा झाली. यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. सध्या या 6 पैकी 3 जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून, विरोधकांच्या मविआतील घटकपक्षांकडेही 3 जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाच्यानुसार, राज्यसभेच्या यंदा रिक्त होणाऱ्या 15 राज्यांतील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल. मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होईल.सर्वाधिक रिक्त जागा उत्तर प्रदेशातील (१०) आहेत. याशिवाय बिहार आणि महाराष्ट्रातील 6-6 जागाही रिक्त होत असून, त्यावर निवडणुका होणार आहेत. तसेच पश्चिम बंगाल (5), मध्य प्रदेश (5), गुजरात (4), कर्नाटक (4), आंध्र प्रदेश (3), तेलंगणा (3), राजस्थान (3), ओडिशा (3), छत्तीसगड (1), हिमाचल प्रदेश (1), हरियाणा (1) आणि उत्तराखंड (1) च्या रिक्त जागांवरही त्याच दिवशी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील 6 खासदारांचे सदस्यत्व संपणार
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागा यंदा रिक्त होणार आहेत. यात सत्ताधारी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या भाजपच्या 3 नेत्यांच्या जागांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचीही जागा यंदा रिक्त होणार आहे. आता या 6 जागांवर हे नेते पुन्हा निवडून जाणार की पक्ष इतर कोणत्या नेत्याला संधी देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेषतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काय होणार? भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवणार की लोकसभेच्या मैदानावर उतरवणार? हे पाहणेही या प्रकरणी महत्त्वाचे ठरणार आहे.
15 राज्यांतील 56 जागा होणार रिक्त
दुसरीकडे, 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तर 2 राज्यांतील 6 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपणार आहे. ही निवडणूक होणाऱ्या राज्यांत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा व हिमाचल प्रदेशाचा समावेश आहे.