पुणे-ऑनलाईन शेअर ट्रेडिंग शिकविण्याचा बहाणा करुन शेअर्स व आयपीओ मध्ये गुंतवणुक करण्यास सांगून तब्बल २३ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव येथील एका ४१ वर्षाच्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. ५६/२४) फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुप वरील विविध नंबर, विविध बँक धारका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्याशी व्हॅटसॲपवरुन संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक कशी करायची हे शिकविण्याचा बहाणा केला. शेअर्स व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगितले. त्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. आणखी पैसे मिळतील असे आमिष दाखवून फिर्यादी यांना २३ लाख ६६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस निरीक्षक राजूरकर अधिक तपास करीत आहेत.