राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न.
मुंबई, दि. २५ जानेवारी
पंचायत राज योजनेला मोठा इतिहास आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज योजना आणून सत्तेचे विकेंद्रीकरण केले. या पंचायत राज प्रणालीतून अनेकांना पक्षाच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्यातून काही आमदार झाले, काही खासदारही झाले. तुमच्यात जर कतृत्व व नेतृत्व असेल तर त्यांना पुढे जाण्याची संधी पंचायत राज संघटनेत आहे. त्यासाठी काम करा, तुमचे नेतृत्व सिद्ध करा संधी नक्की मिळेल, असे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस नारायण सिंग, सहप्रभारी विवेक अवस्थी, गीता कवडे, श्रवण गौडा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राजीव गांधी यांनी पंचायत राज योजना आणून महिलांना मोठी संधी दिली. पंचायत राजमध्ये ३३ टक्के आरक्षण दिल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढले. पंचायत राजमुळे केवळ राजकीय संधीच मिळाल्या नाहीत तर महिलांना सामाजिक क्षेत्रातही लाभ झाला, संरक्षण क्षेत्रातही महिलांना स्थान मिळाले त्याचे मुळ पंचायत राज योजनेत आहे. आता भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षणाचा निर्णय घेतला आहे पण तो लवकर अमलात येणार नाही. केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांची मते मिळावीत यासाठी भाजपाने हा निर्णय घेतला आहे. भाजपाने अशा अनेक योजना जाहीर केल्या परंतु त्याची अंमलबजावणी किती झाली ते पहा.
अनेक वर्षांच्या संघर्षातून मिळालेले स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही टिकवण्यात पंचायत राज संघटनेचे योगदान महत्वाचे आहे. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देवरॉय यांनी संविधानातून ‘आम्ही भारताचे लोक’ हे काढून टाकले पाहिजे असे सांगितले. ‘आम्ही भारताचे लोक’ यात फार मोठी ताकद आहे, यात कोणत्याही एका धर्माला महत्व दिलेले नाही म्हणून आज भारत जगात एक मोठी शक्ती म्हणून टिकून आहे.
विशाल मुत्तेमवार म्हणाले की, सोशल मीडियाचे महत्व सध्या अत्यंत महत्वाचे आहे. या माध्यमातून भाजपाचा खोटा प्रचार हाणून पाडण्याचे काम आपणास करावे लागणार आहे. भाजपा मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत असते पण आपण मात्र मुळ मुद्द्यांवरच भर द्यायचा आहे. सोशल मीडियाचे महत्व ओळखून काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करा व भाजपाचा खोटा प्रचार खोडून काढा, असे आवाहन मुत्तेमवार यांनी केले.