मिहाना पब्लिकेशन्स तर्फे डॉ.ज्योती चिंचणीकर लिखित ‘विजयनगर कहानी वैभवशाली साम्राज्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : इतिहास हा केवळ विरंगुळा म्हणून वाचू नये, तर इतिहासातून आपले भविष्य अधिक उज्वल घडविता यावे याची प्रेरणा मिळावी यासाठी अभ्यासणे गरजेचे आहे. भारताला गौरवशाली इतिहास लाभला आहे, हा इतिहास आजच्या तरुणांच्या भाषेमध्ये म्हणजेच डिजिटल पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना इतिहासातून निश्चितच प्रेरणा मिळू शकेल, असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मीहाना पब्लिकेशन्स तर्फे डॉ.ज्योती चिंचणीकर लिखित ‘विजयनगर कहानी वैभवशाली साम्राज्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृहात झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या, ज्येष्ठ लेखक अभिजीत जोग, प्रकाशिका अमृता कुलकर्णी, ऋतुपर्ण कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, भारताला विविध राजांचा इतिहास लाभलेला आहे त्यांच्या विजयाचा आणि चुकांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. चुकांचा इतिहास अभ्यासताना त्या चुका पुन्हा होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. विजयनगर साम्राज्य भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे, त्याची सोनेरी क्षण आजच्या तरुणांना या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे, कोणताही इतिहास अभ्यासताना तो केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर डोळस पद्धतीने अभ्यासला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने गौरवशाली भविष्य निर्माण करू शकू.
अभिजीत जोग म्हणाले ,विजयनगर साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील एक दैदिप्यमान आणि गौरवशाली साम्राज्य होते. हा इतिहास आजच्या तरुणांना फारसा माहीत नाही. भारताचा इतिहास म्हणजे केवळ दिल्लीचा इतिहास नाही. मुघलांच्या इतिहासाच्या पलीकडेही भारताचा इतिहास आहे. भारताच्या दक्षिण पश्चिम आणि पूर्व भागांमध्ये अनेक हिंदू राजे होऊन गेले त्यांचा गौरवशाली इतिहास आपण आजच्या तरुणांना माहिती करून देणे गरजेचे आहे. आजपर्यंत भारताचा इतिहास तोडून मोडून लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला परंतु हिंदू राजांचा गौरवशाली इतिहास आपण जसाच्या तसा तरुणांपर्यंत पोहोचविला पाहिजे.
डॉ.ज्योती चिंचणीकर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा विजयनगर साम्राज्यातूनच मिळाली असावी, असा अभिप्राय बाळशास्त्री हरदासांपासून बाबासाहेब पुरंदरे यांच्यापर्यंत सर्वांनी व्यक्त केलेला आहे. मग त्या दृष्टिकोनातून मी विजयनगर साम्राज्याच्या इतिहासाचा अभ्यास केला. विजय नगरच्या स्थापनेपासून ते त्याचा दारुण अंत कसा झाला येथपर्यंतचा संपूर्ण कालखंड या कादंबरीत येतो. असा पूर्ण इतिहास सलगपणे सांगणारी कादंबरी आजवर मराठीमध्ये लिहिली गेलेली नव्हती.
अमृता कुलकर्णी म्हणाल्या, मराठी साहित्यामध्ये दर्जेदार साहित्य कृतींमध्ये हे पुस्तक निश्चितच स्थान मिळवू शकेल विजयनगर साम्राज्याची माहिती रंजकपणे या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. विजयनगर साम्राज्याच्या संदर्भात कॉन्टिनेन्टल प्रकाशनने यापूर्वी तीन पुस्तके प्रकाशित केली आहे. मीहाना प्रकाशनातर्फे आम्ही विजयनगरचा संपूर्ण इतिहास सांगणारी ही कादंबरी प्रकाशित करीत आहोत. यामधून विजयनगर साम्राज्याचा संपूर्ण इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगितलेला आहे.
सुनील गोडसे आणि मुक्ता म्हसवडे यांनी या पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन केले. डॉ. गीतांजली पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. दीपक पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सानिका कुलकर्णी यांनी आभार मानले.