कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरातर्फे ५१ प्रकारच्या फळ आणि भाज्यांची आरास
पुणे : टोमॅटो, बटाटे, कणीस, पालक, गाजर, मटार यांसारख्या भाज्यांसह द्राक्ष, डाळींब, संत्र्यासारख्या फळांनी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर सजविण्यात आले. दत्तमहाराजांना परिधान केलेला ‘शाक’ हार हा शाकंभरी पौर्णिमा कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. फळांनी साकारलेले तोरण आणि फळ-भाज्यांवर केलेली नक्षीदार सुरेख आरास आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये टिपण्याचा मोह अनेकांना झाला.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शाकंभरी पौर्णिमाँ आणि गुरूपष्यांमृत निमित्त दत्तमंदिरामध्ये ५१ प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करुन आरास साकारण्यात आली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते.
दत्त मंदिरामध्ये सकाळी प्रांजली व विवेक ढेरे यांचे शुभहस्ते श्री दत्तयाग झाला. सुपर मॅटच्या संचालिका शानी नौशाद व नौशाद यांचे हस्ते माध्यान्ह आरती देखील झाली. तब्बल १ टन भाज्या व फळांचा वापर याकरिता करण्यात आला.
युवराज गाडवे म्हणाले, प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता. तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरीता ॠषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला, सगळीकडे सुख समृद्धी नांदू लागली. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी आरास करण्यात आली.