यशोधन नागरी सहकारी पतसंस्था आणि चौफेर प्रतिष्ठान तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान
पुणे : मुसलमानांच्या शेकडो वर्षांच्या राजवटीमध्ये हिंदुस्तानातील तीन हजारांवर अधिक हिंदूंची मंदिरे उध्वस्त करण्यात आली आणि त्या ठिकाणी मशिदी निर्माण करण्यात आल्या. नमाजासाठी नव्हे तर हिंदूंचा अपमान करण्यासाठी मंदिरे पाडून मशिदी उभारण्यात आल्या. हिंदूंनी कायम गुलामगिरीच्या मानसिकतेत राहावे हा त्यामागील हेतू होता, परंतु अयोध्येमध्ये तयार होणारे प्रभू श्रीराम मंदिर हे हिंदूंचे प्रेरणास्थान असून आपण रामराज्य आणण्यासाठी यापुढे आणखी जोमाने प्रयत्न करणार आहोत, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केली.
यशोधन नागरी सहकारी पतसंस्था आणि चौफेर प्रतिष्ठान तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात देवधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, पतसंस्थेचे अध्यक्ष अविनाश आपटे, चौफेरचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर, श्री यशोधन पतसंस्थेचे सचिव राहुल भाटे, आशा क्षीरसागर, गौरव बापट, कुणाल टिळक, वृंदा जोशी, प्राची डोळे, रामचंद्र मेथे यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात भरीव योगदानासाठी रामचंद्र मेथे, देवांश घाटे, वृंदा जोशी आणि प्राची डोळे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच माऊली वृद्धाश्रमाला आर्थिक मदतही देण्यात आली.
सुनील देवधर म्हणाले, श्रीराम मंदिरासाठी तीनशे वर्षात ८७ लढाया झाल्या. अनेकांना बलिदान द्यावे लागले, परंतु काँग्रेसच्या अल्पसंख्याकांना खुश करण्याच्या राजकारणामुळे हिंदूंचे हे राम मंदिर होऊ शकले नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मात्र हिंदूंचे हे स्वप्न पूर्ण झाले. चारशे वर्षांनंतर प्रभू श्रीराम आपल्या स्वतःच्या जन्मस्थानी विराजमान होणार आहे. या स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पाच पणत्या लावूनnसोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही सुनील देवधर यांनी यावेळी केले.