जलेंगे हम तो जल जाएगा सारा गुलिस्तां माली, समझ मत सेहन-ए-गुलशन में मेरा ही आशियाना है! ओछी राजनीति के लिए नफ़रत का खेल बंद करो, देश में भाईचारे को बढ़ाओ।’
मुंबई-मीरा भाईंदर परिसरात झालेल्या दोन गटातील वादानंतर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी प्रकरणावरुन कळकळीची विनंती केली आहे. या संदर्भात बोलताना आमदार अबू आझमी म्हणाले की, अशा प्रकरणामुळे समाजातील संस्कृतीला खीळ बसत आहे. मी कोणत्याही मंदिराच्या विरोधात नाही मात्र, मुद्दाम मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळासमोर जात, चिथावणी देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ वाढवले जात असल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला आाहे.
या संदर्भात अबू आझमी म्हणाले की, जलेंगे हम तो जल जाएगा सारा गुलिस्तां माली, समझ मत सेहन-ए-गुलशन में मेरा ही आशियाना है! ओछी राजनीति के लिए नफ़रत का खेल बंद करो, देश में भाईचारे को बढ़ाओ।’ असे आवाहन देखील त्यांनी केले. विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याच्या आधी देखील अबू आझमी यांनी असा प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली होती. तसेच सर्व मुस्लिम समाजाला शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले होते.
अयोध्येतील वादाच्या जागेवर आधी मंदिर होते, याचे पुरावे मिळाले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले आहे. केवळ लोकभावनेच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही देखील लोकभावनेचा आदर करतोय. मात्र, काही लोक मुद्दाम मुस्लिमांच्या परिसरात, त्यांच्या धार्मिक स्थळासमोर जय श्री रामच्या घोषणा देत होते . या माध्यमातून मुस्लिम समाजाला उसकवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
मीरा रोड परिसरात तणाव कसा वाढला, नेमके प्रकरण काय?
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास, तीन कार आणि मोटारसायकल वरून 10 ते 12 लोकांचा एक गट नया नगर येथून रॅली काढत असताना त्यांची इतर समाजातील सदस्यांशी हाणामारी झाली. सोमवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रॅली दरम्यान भगवान रामाच्या घोषणा दिल्या जात होत्या. मीरा रोड परिसरात या चकमकीनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त मुंबई पोलीस, पालघर पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस, आरएएफ (रॅपिड अॅक्शन फोर्स), एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा दल) आणि एसआरपीएफ देखील परिसरात तैनात करण्यात आले आहेत. या घटनेबाबत मीरा भाईंदरचे अतिरिक्त सीपी श्रीकांत पाठक यांनी सांगितले की, ‘आम्ही घटनेचा तपास करत आहोत. आरोपींवर कारवाई केली जाईल, मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो, पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे.’