गौतम अदानी उद्या देशालाही वेठीस धरतील:मुख्यमंत्र्यांनाही हे माहिती, पण सांगतील कुणाला? राज ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना टोला

Date:

टाटा, अबांनींनी स्वतःचे व्यवसाय स्वतः उभे केले

पुणे–मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. टाटा, अंबानी, बिर्ला, हिंदुजा सारख्या उद्योगपतींना इथपर्यंत येण्यासाठी 50 ते 100 वर्षे लागली. पण केंद्राच्या रेड कार्पेटमुळे गौतम अदानींनी अवघ्या 10 वर्षांतच या उद्योगपतींना मागे टाकले. या एकाच उद्योगपतीला सर्वकाही देण्यात आले, तर एक दिवस हा माणूस अवघ्या देशाला वेठीस धरेल, असे ते म्हणालेत.

राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील सभेद्वारे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण काही अदानींचे वकील नसल्याचे नमूद करत त्यांच्यावर पलटवार केला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा गौतम अदानी व फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, अंबानी, टाटा, बिर्ला, हिंदुजा आदी उद्योगपतींना इथपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 50 ते 100 वर्ष लागली. पण यांच्याही पलिकडे एक माणूस जातो आणि तो अवघ्या 10 वर्षांतच मोठा होतो. माझा हा विषय आहे.

उद्या तुमच्या सिमेंट, स्टिल, पोर्ट, एअरपोर्ट, वीज आदी सर्व गोष्टींची मोनोपॉली एका माणसाकडे आली, तर तो माणूस या देशाला वेठीस धरू शकतो. केंद्र सरकार या माणसाला सर्व गोष्टी पुरवण्यासाठी विशेषतः कुठेही जा आणि काहीही करा यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, उद्या उद्योगधंदे वाढले. उद्योगपती वाढले, तर रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण झाल्यानंतर घरे उभी राहतात. मुले – मुली उभी राहतात. त्यांच्या त्यांना नोकऱ्या मिळतात. त्यांचे संसार उभे राहतात. त्यामुळे उद्योगाला विरोध आहे, असा मूर्खपणा माझ्या बोलण्यात कधीही नव्हता, नाही आणि येणारही नाही. परंतु, एक गोष्ट मी नमूद करेन की, अंबानी, टाटा, बिर्लांसारख्या उद्योगपतींनी स्वतःचे साम्राज्य स्वतः उभे केले आहे. त्यांनी त्यांचे उद्योग स्वतः उभे केलेत. पण आज केंद्राने 7 ते 8 विमानतळ एकट्या गौतम अदानीला दिली आहेत.

यातील केवळ नवी मुंबईचे विमानतळ सोडले तर एकही विमानतळ गौतम अदानींनी बांधले नाही. ते दुसऱ्यांनी बांधले आहेत. पोर्ट्सच्या (बंदर) बाबतीतही असेच आहे. एक मुंद्रा पोर्ट सोडले तर जेवढी बंदरे आज गौतम अदानींच्या हातात आहेत त्यातील एकही पोर्ट अदानींनी बांधले नाही. ते दुसऱ्यांचे पोर्ट्स होते. त्यांच्या कानशिलावर बंदू ठेवून त्यांच्याकडून हे पोर्ट्स विकत घेतले आहेत.

राज ठाकरे म्हणाले, सिमेंटच्या व्यवसायात गौतम अदानी कधीही नव्हते. पण त्यांनी अल्ट्राटेक, अंबुजा इतर कंपन्या विकत घेऊन हा माणूस आज या व्यवसायात क्रमांक दोनचा झाला आहे. आज बिर्ला एक नंबरला आहे आणि हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या 10 वर्षांत एक माणूस सिमेंटच्या व्यवसायात दोन नंबरला जातो. दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून, दुसऱ्यांचे व्यवसाय हातात घेऊन. त्यांचे पॉवर, स्टिलसह अनेक उद्योग तसेच आहेत. मला मुख्यमंत्र्यांना फक्त एवढेच सांगायचे आहे की, हा विषय कुणाच्या ग्रोथच्या नाही, तर ग्रोथ कशी होत आहे, उद्योगपती वाढ कशी होत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, हा एकच माणूस (गौतम अदानी) उद्या या देशाला वेठीस धरू शकतो. याचे उत्तम उदाहरण हे इंडिगोचे आहे. इंडिगोने संपूर्ण देश अक्षरशः वेठीस धरला. आज एकट्या इंडिगोकडे विमान प्रवासाचा 65 टक्के वाटा आहे. या एका विमान कंपनीने व्यवसाय बंद केल्याने किंवा सेवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल झाले हे सर्वांनी पाहिले. हा धोका सर्वाधिक आहे. हा धोका मुख्यमंत्र्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना समजणे गरजेचे आहे. अर्थात त्यांना समजले असेलही, पण ते सांगतील कुणाला? ही गोष्ट लोकांपुढे जाणे गरजेचे होते.

गौतम अदानींना हे उद्योग उभे करताना अर्थसहाय्य कुठून झाले? कोणकोणत्या बँकांना व वित्तीय संस्थांना यांना अर्थसहाय्य करायला लावले? कारण उद्या अशा प्रकारच्या गोष्टी कोलॅप्स झाल्या, तर नोकऱ्या जातील. देश बरबाद होईल. संपूर्ण देश ठप्प होईल. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे. तुम्ही हे टूल वापरून महाराष्ट्रातील शहरे काबिज करण्यासाठी जात आहात हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा धोका आहे. मी त्यावर भाष्य केले होते, असे राज ठाकरे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ. गोऱ्हे

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुण्यात पुनरावृत्ती; हुंडाबळी घटनेवर उपसभापती डॉ....