मुंबई- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिक येथील मेळाव्यात बोलताना भाजपावर टीका केली. त्यांच्या या टिकेला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत. याच बेचैनीतून त्यांची बडबड सुरू असते, असा टोला दरेकर यांनी यावेळी लागवला.
भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांची चिरफाड केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा तोल ढासळलेला आहे. काल राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जे अभूतपूर्व यश लाभले आणि भाजपाविषयी जनमनात एक वेगळ्या प्रकारचा आदर, सहानुभूती निर्माण झाली त्याची मळमळ उद्धव ठाकरेंना होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षात ज्या रावणी प्रवृत्तीने काम केले त्याच्या अधोगतीला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या निवडणुकांत देशातील जनता त्यांची रावणी प्रवृत्ती भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. काल राज्यातील जनतेच्या घराघरांत, गल्लीबोळात, वाड्यावस्त्यांवर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण आनंदोत्सव लोकं लुटताना दिसत होती. याचाच पोटशूळ उद्धव ठाकरेंना असून बेताल बडबड करणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाने ते बेचैन झालेत. त्या बेचैनीतून अशा प्रकारची वक्तव्ये ते करत आहेत.
संजय राऊत यांच्यावर बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, संजय राऊत यांची शेवटची घटका आलेली दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने काय मानले आहे हे काल संपूर्ण देशाने, जगाने पाहिले आहे. राम मंदिराचे उदघाटन, प्राणप्रतिष्ठा हे मोदींच्या नेतृत्वात देशवासियांना आनंद मिळाला आहे. स्वतः रावणासारखे वागणारे संजय राऊत भरकटले आहेत. ते असेच बेताल बोलत राहणार. त्यांची पंतप्रधान मोदींवर बोलायची लायकी नाही, असा घणाघातही दरेकर यांनी केला.
राम ही आमची मालमत्ता आहे हे आम्ही कुठेही सांगत नाही. पण तुमच्या कृतीतून कुठेही रामभक्ती प्रकट होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नैतिक अधिकारच नाही. तुम्ही ज्यांच्यासोबत आहात, ज्यांचे विचार उबवताय ते रामाच्या श्रध्येचे नाही. काल अयोध्येत देशातील सगळ्या पक्षांना, घटकांना बोलावले होते. भाजपाचा झेंडा, बॅनर नव्हता की आमचे पदाधिकारी नव्हते. त्यामुळे राम हा देशातील सर्व हिंदूंचा श्रद्धेचा विषय आहे. आम्ही कधीच रामावर मालकी सांगितली नाही. परंतु मनोभावे भाजपच्या, कार्यकर्त्यांच्या श्रद्धा रामाप्रती आहेत हे निर्विवाद आहे.
चौकट
उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात
महाराष्ट्रासाठी काय काम केले?
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे अडीच वर्ष घरात बसून होते, महाराष्ट्रासाठी त्यांनी काय काम केले ते पहिले सांगावे आणि मग रामाविषयी बोलायला आपले तोंड उघडावे, असा टोला लगावला.