सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने गीत रामायण
पिंपरी, पुणे (दि. २२ जानेवारी २०२४) मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त देशभर उत्साह आणि आनंदी वातावरण आहे.अयोध्या मध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना व्हावी ही कोट्यावधी भारतीयांची मनोकामना पूर्ण होत आहे. त्याच्या पूर्व संध्येला पिंपळे निलख मधील समस्थ ग्रामस्थ आणि सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम रामाच्या भक्तीची अनुभूती देणारा आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या दीर्घ तपस्येतून तयार झालेले आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरसाज चढवलेल्या या रचना स्वर्ग सुखाची ब्रम्हानंदी अनुभूती देणाऱ्या आहेत असे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने गायक तुषार रिठे आणि सहकारी यांचे गीत रामायण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ रामभक्तांचे आणि गायक तुषार रिठे, अमिता घोगरी, निशा रेणापूरकर, सुनंदा दंडे यांचा सत्कार आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे, माजी नगरसेविका आरती चोंधे, भुलेश्वर नांदगुडे, नितीन इंगवले, गणेश कस्पटे, भरत इंगवले, अनंत कुंभार, अनिल संचेती, फिरंगोजी कामठे, बाळासाहेब इंगवले, मारुती मुरकुटे आदी उपस्थित होते.