पुणे, दि. २२ जानेवारी २०२४ : मोह अनेक येतात, पण अभिनय शिकण्यासाठी वेळ दिला पाहीजे, असा सल्ला अभिनेते मनोज वाजपेयी यांनी विद्यार्थ्यांना दिला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘द क्राफ्ट ऑफ अॅक्टींग’ या विषयावर ते बोलत होते.
महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार् पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, समर नखाते उपस्थित होते.
ते म्हणाले, अभिनय शिकण्यासाठी संयमाची गरज आहे. आज संयम नसल्याचे दिसत आहे. तुम्ही अभिनय शिकायला जाता आणि तुम्हाला कोणी ओटीटीवर बोलवतो, कोणी नाटक करायला बोलवतो. असे खुप मोह येतात. त्यामुळे तुमचे लक्ष विचलीत होते. पण अभिनयाचे शिक्षण नीट घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळ दिला पाहिजे. आजकाल कोणाला वेळ द्यायचा नाही. सगळ्यांना अभिनयही झटपट ५-६ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये शिकायचा आहे.
ते म्हणाले, “अभिनय करणाऱ्या आणि विशेषतः नाटकात काम करणाऱ्यांनी, नाचाचा एक तरी प्रकार शिकला पाहिजे. अभिनय करणाऱ्या प्रत्येकाने कविता मोठ्याने सतत वाचली पाहिजे. लेखकाने खूप मेहनत घेऊन संहिता लिहिलेली असते. ती अशीच घेता येत नाही. तिच्यावर तुम्ही काम केले पाहीजे. एका अभिनेत्याला आपले शरीर, आवाज हे सगळे माहीत पाहीजे. अभिनेत्यांना स्वतःविषयी खुप प्रेम असता कामा नये. तुम्हाला दुसरे कोणी काही म्हणण्यापेक्षा, स्वतःच स्वतःचे टीकाकार व्हायला हवे.” ते म्हणाले, तुमच्याकडे संस्था बनण्याची ताकद असेल, तर तुम्हाला कोणत्याही संस्थेत जाऊन शिकण्याची गरज नाही.
आपण आणि आपला अभिनय यांविषयी बोलताना ते म्हणाले, “मै रहू ना रहो, किरदार रहना चाहीये. पूर्वी मी केलेल्या भूमिका माझ्या मनात सतत रहायच्या. ‘शूल’ मधील भूमिका खूप काल माझ्या मनात रेंगाळत होती. त्याचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. नंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि स्वतःवर काही प्रयोग केले. योगाचा उपयोग केला. त्याचा सकारात्मक परिणाम ‘पिंजर’मधल्या भूमिकेमध्ये दिसतो. तुम्हाला एखाद्या भूमिकेमध्ये जाता आले पाहीजे.”
नाटक आणि चित्रपट यांमधला फरक सांगताना ते म्हणाले, की अभिनेता हा नाटकात मोठा असतो, पण दिग्दर्शक हा चित्रपटात खूप मोठा असतो. अॅक्टर्स डिरेक्टर खुप कमी आहेत. अभिनेते हे गोंधळलेले असतात. त्यांना दिशा देणे गरजेचे असते, त्यासाठी दिग्दर्शक महत्त्वाचा असतो. त्यांनी आपण अभिनयाकडे कसे आलो, याची कथा सांगितली. ते म्हणाले, “मी बिहारच्या एका छोट्या गावातून आलो. मला शिकण्यासाठी जिल्हा शाळेमध्ये पाठवण्यात आले. तिथे एका कवितेच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आले. मी पाचवीला असताना कविता म्हंटली आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. तिथे मला मी सापडलो, माझे स्वातंत्र्य सापडले. बिहारमध्ये नाटक करणाऱ्यांना भांड म्हंटले जायचे. आम्ही नसरुद्दीन शहा, राज बब्बर यांच्या कहाण्या वाचत आलो होतो. पुढे दिल्लीला आलो आणि थिएटर काय आहे, हे समजले. १० वर्षे थिएटर केले. प्रत्येकवेळी नवा अनुभव यायचा. ‘अॅक्ट वन’ नावाचा आमचा ग्रुप होता. आता तो ग्रुप बंद झाला, कारण लोकांना आता झटपट हवे आहे. आम्ही थिएटर करताना पथनाट्य करायचो. प्रोसेनियम थिएटर करायचो. आवाजावर मेहनत घ्यायचो. ‘एनएसडी’साठी खूप कष्ट घेत होतो, तरी मला तिथे प्रवेश मिळत नव्हता. मग बॅरी जॉन यांनी काम करण्यासाठी माझी निवड केली. मला सगळे शिकवले. आज मी जे काय आहे, ते सगळे त्यांच्यामुळेच. रस्त्यावरची मुलांसाठी एक नाटक करण्याचा प्रयोग बॅरी यांनी केला. शाहरुख खान त्यांचा अभिनेता होता, तेंव्हा मी त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत होतो.”
त्यांनी सांगितले, की एक दिवस तिग्मांशू धूलिया आले, मला म्हणाले की शेखर कपूर यांनी बोलावले आहे आणि बॅंडीट क्वीनमध्ये भूमिका मिळाली पण तीचा करियरसाठी फायदा झाला नाही. मुंबई हे अवघड शहर आहे. ५ वर्षं असेच संघर्ष करीत काढले. मला माझ्याबद्दल जे वाटत होते ते सगळे खोटे आणि आभासी होते. पण पुढे ‘सत्या’च्या भूमिकेने मला करियर दिले. ते म्हणाले, “मला माझी फिल्मो,ग्राफी तयार करायची होती. म्हणून मग ‘भोसले’, गली गुलिया, अलिगढ यांसारखे चित्रपट केले. स्टारडम येते आणि जाते, पण मी स्क्रिप्टकडे लक्ष देतो. नव्या कल्पना, नवे दिग्दर्शक यांना प्राधान्य देतो.”
‘कॉमन मॅन’ या त्यांच्या गाजलेल्या ओटीटी मालिकेविषयी बोलताना ते म्हणाले, की अमेरिकेमध्ये नार्कोज’ बघून लक्षात लक्षात आले, की ओटीटी भारतामध्ये येणार आहे. पण मी ठरवले की वेगळे असेल, तरच ओटीटीवर काम करायचे आणि ‘फॅमिली मॅन’ केले. त्यासाठी आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन डोळ्यासमोर होता.
मराठीचा संबंध सांगताना वाजपेयी म्हणाले, “सत्या’च्या भूमिकेसाठी मराठी शिकण्याची गरज होती. आमच्याकडे येणाऱ्या कोलहपूरच्या मावशी होत्या, त्यांनी मराठी शिकवले.. अलिगढमधील भूमिकेसाठी आमचे एक स्नेही होते त्यांनी मराठी साहित्य आणि मराठी शिकवले. मराठी २५ दिवस शिकलो आणि साहित्यामध्ये समरसून जाणारा प्राध्यापक अनुभवला.विजय तेंडुलकर यांच्याविषयी बोलताना वाजपेयी म्हणाले, की लहानपणापासून त्यांची नाटके वाचत-बघत होतो. ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’, ही आवडती नाटके आहेत. तेंडुलकर हे आजही नव्या पिढीने वाचले पाहिजेत कारण ते काळाशी सुसंगत आहेत.
अभिनय शिकण्यासाठी वेळ द्या -अभिनेते मनोज वाजपेयी
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/