पोलीस आणि महापालिकेला दिले निर्देश
पुणे दि.२०: पुणे शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना प्रवास करण्यास बराच वेळ लागत आहे. तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण देखील होत आहे. यावर योग्य उपाययोजना करून शहरातील वाहतुकीची समस्या सोडविता येईल. यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन ठोस ऊपाययोजना केली पाहिजे असे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
आज पुणे येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शहरातील वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीबाबत स्थानिक पोलिसांसोबत चर्चा केली आणि त्याबाबतचा आढावा घेतला. याप्रसंगी, विश्रामबाग सहायक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुंवर, शिवाजीनगर वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, शिवाजीनगर वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक श्री. राजू चव्हाण आणि चतुरशृंगी पोलीस निरीक्षक श्री. शफील पठाण उपस्थित होते.
यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शहरातील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होत असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मार्ग मिळणे कठीण आहे. त्यामुळे रस्ते शक्य तेवढे मोकळे ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बऱ्याचदा नागरिक देखील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. यासोबतच,
● महानगरपालिकेने चौकाचौकातील वॉर्डनची संख्या वाढवली पाहिजे. हे वॉर्डन वाहतूक कोंडी सोडविण्यासोबतच वयस्कर माणसांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत असतात.
● हलकी वाहने, दुचाकी वाहने यांसाठी पर्यायी रस्ता म्हणून अंतर्गत रस्त्यांच्या वापरण्यावर भर द्यावा. तसा पर्यायी रस्त्यांचा नकाशा प्रसिद्ध करावा.
● पादचार्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सोपे व्हावे यासाठी रस्त्यांवर पांढरे पट्टे आखावेत.
● मॉडेल कॉलनीतील थोरात चौक, दीप बंगला चौकाचा शहराच्या मुख्य चौकात समावेश करावा. याचौकांसह शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत त्यावरून ज्या भागात वाहतूक कोंडी झाली असेल तेथे तात्काळ वायरलेसवर संदेश पाठविला जावा.
● वाहतूक पोलिसांकडे लाऊड स्पीकर द्यावा त्यावरून गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांना, पादचाऱ्यांना सूचना दिल्या जाव्यात.
● प्रत्येक सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांसाठी बुथ उभारण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करावी.
अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना दिल्या.
तसेच वाहतूक कोंडीवरील योग्य उपाययोजना राबविण्याबाबत आयुक्त पुणे महानगरपालिका यांना स्वतंत्र निवेदन दिले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.