पुणे-वाहन शोरूमच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून,बँकेत शोरूमचे बनावट खाते उघडून बँकेला 38 लाखांचा गंडा घातला आहे. शहरातील धायरी परिसरातील प्रेरणा को-ऑपरेटिव बँक या बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम एकनाथ दारवटकर आणि निखिल हनुमंत साळुंखे असे फसवणुक केलेल्या आरोपींची नावे आहेत.-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल साळुंखे यांनी मोटो ऑटोमोबाईल्सच्या नावाने बनावट आयसीआयसीआय बँक ,ऑनलाईन खाते उघडून प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धायरी यांच्याकडून 16 लाख रुपये वाहन कर्ज घेतले. तर आरोपी शुभम दारवटकर याने संबंधित बँकेकडून घेतलेले वाहन कर्ज निखिल साळुंखे यांच्या मास्क ऑटोमॅटिकच्या नावाने येस बँक अमनोरा टाऊन सेंटर शाखा, पुणेचे बनावट ऑनलाईन खाते उघडून त्यात 22 लाख रुपये घेतले.
वाहन कर्जाच्या रकमेतून त्यांनी वाहन घेणे आवश्यक असताना, त्यांनी वाहन न घेता शोरूमचे बोगस बँक खाते, बनावट लेटरहेड, बनावट रबरी शिक्के, बनावट कोटेशन ,बुकिंग रिसीट वगैरे कागदपत्रांचे बनावटीकरण करून ते बनावट कागदपत्र प्रेरणा बँक धायरी शाखेत सादर केले. आपसात आरोपींनी संगणमत करून संबंधित बँकेची एकूण 38 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
सदरचा प्रकार हा 27/10/2019 ते 19/1/2024 दरम्यान घडलेला आहे. याबाबत मेघनाथ सदाशिव बोडस पुणे यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे दाखल केली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस पुढील तपास करत आहेत.