पुणे : “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे ५२७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होत असून, येत्या सोमवारी (दि. २२) जगातील सर्वात मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होतील. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करावे,” असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला पुणेकरांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमावेळी हभप योगिराज महाराज गोसावी पैठणकर, हभप पंकज महाराज गावडे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, साध्वी वैष्णव दीदी सरस्वती, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, उपाध्यक्ष राजेश पांडे, हेमंत रासने, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दादा वेदक, मा. का. देशपांडे, पतित पावन संघटनेचे नितीन सोनटक्के उद्योजक रविंद्र रांजेकर, प्रसाद देशपांडे, नंदू घाटे, सारंग काळे आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “एकविसाव्या शतकातील पिढी घडवणारा ‘अपने अपने राम’ हा कार्यक्रम आहे. वाल्मिकी रामायण अतिशय कलात्मक व काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची शैली डॉ. कुमार विश्वास यांची असून, या रामकथेतून प्रत्येकाने मूल्ये, संस्कार शिकण्याची गरज आहे. हा कार्यक्रम प्रत्येकाला जगण्याची दिशा देणारा आहे. अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या उत्सवात आपण प्रत्येकाने सहभागी व्हावे.”
“देशभर साजरा होणाऱ्या या उत्सवात प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुटी देण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारने सुटी जाहीर केली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मोदीजींनी गेल्या ११ दिवसांपासून अनुष्ठान केले असून, मनोभावे रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत,” असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
पंकज महाराज गावडे म्हणाले, “प्रभू रामाच्या संदर्भात अभ्यासपूर्ण मांडणी करणारे डॉ. कुमार विश्वास यांचे व्यक्तिमत्त्व आहे. या कार्यक्रमात प्रभू रामाच्या नावाची मुरली वाजत असून, राम भक्तांचे मोहोळ जमले आहे. प्रभू श्रीराम मानवजातीचे अधिष्ठान आहेत. त्यांच्या आदर्शावर चालण्याची गरज आहे. आपण सर्वानी राम समजून घेत, त्यांच्यातील गुण आत्मसात करायला हवेत.”
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध करून देताना आनंद होतो आहे. अयोध्येत रामलला विराजमान होत असताना देशातील वातावरण राममय झाले आहे. शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे स्वप्न साकारत आहे, हा आपल्या सर्वांसाठी उत्साहाचा क्षण आहे.”