श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट : रास्ते राम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांच्या हस्ते अनावरण
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने अयोध्या येथील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त गुरूवारी तब्बल २१ फूटी प्रभू श्रीरामलल्लांची प्रतिमा बुधवार पेठेतील मंदिरावर विराजमान करण्यात आली आहे. प्रतिमेला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.
या प्रतिमेचे अनावरण रास्ते राम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात पाच दिवस रामरक्षा पठण तसेच विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रतिष्ठपनेच्या दिवशी सोमवारी सकाळी सुनिल देवधर यांचे हस्ते मंदिरात श्री दत्त याग संपन्न होणार आहे. तसेच दुपारी अनाथ मुलांना उबदार स्वेटर व सुग्रास भोजन देखील देण्यात येणार आहे. मंदिरात दिवसभर भाविकांना मिष्ठान्न प्रसादाचे नियोजन केले आहे.
यावेळी मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला फरासखाना पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिनी गलांडे, हिमालयात तपस्या केलेले स्वामी पुरुषोत्तम आनंद सरस्वती उर्फ भिडेस्वामी, माधवराजे रास्ते तसेच मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागीरदार, विश्वस्त महेंद्र पिसाळ, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्त महाराजांच्या आरती देखील झाली. या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच पुढील पाच दिवस मंदिरात एक लक्ष श्रीराम नाम जप संकल्पामध्ये योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.