अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन अन् रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशातील रामभक्तांचे डोळे लागलेत. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवशी केंद्राने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारनेही केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा धुमधडाक्यात साजरा होत आहे. 22 जानेवारीचा सोहळा बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत. हा ऐतिहासिक क्षण आहे. सर्वांना तो बघता यावा, यासाठी महाराष्ट सरकारने सर्वाजनिक सुट्टी जाहीर करावी, यासाठी लोकप्रतिनिधी व विविध धार्मिक, सामाजिक आदी संस्थांनी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले होते. सोहळ्याच्या दिवशी लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करणार आहेत. त्यामुळे बाधा निर्माण होऊ नये. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही याचा आनंद घेता यावा, यासाठी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात आली असून राज्यपाल यांच्या आदेशान्वये 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्राने घोषित केली आहे अर्धी सुट्टी
दुसरीकडे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्राने तसा आदेशही जारी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना व त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्राने अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना 22 जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था व केंद्रीय औद्योगिक संस्था व कार्यालयांत दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी असेल.