पुणे-
22 जानेवारीला पुण्यात चिकन आणि मटन विक्री बंद ठेवण्यात येणार आहेत. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कुरेशी समाजाने हा निर्णय घेतला आहे. तसेच, कुरेशी समाज प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार असून लाडू आणि पेढे वाटून उत्सव साजरा केला जाणार आहे.
यासंदर्भात ऑल इंडिया कुरेशी जमियतुल कुरेश अॅक्शन कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी माहिती दिली आहे. गुरूवारी कुरेशी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय समाजाच्या वतीने सर्वानुमते घेण्यात आला आहे.
कुरेशी समाज प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार
अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून या उत्सवाचा आनंद कुरेशी समाजाला होत आहे. या सोहळ्याचा आनंद देशभर साजरा केला जाणार आहे. यासाठी ऑल इंडिया जमीयतुल कुरेश अँक्शन कमेटीच्या वतीने 22 जानेवारीला कुरेशी समाज आपले सर्व व्यवहार बंद ठेवणार आहे. तसेच, या कार्यक्रमात आनंद व उत्साहाने सहभागी होत आहेत, असे सादिक कुरेशी म्हणाले.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष हसन अब्बास कुरेशी, सेक्रेटरी मेहमूदलाल कुरेशी, उपाध्यक्ष आरीफ बशीर कुरेशी, ज. सेक्रेटरी वाहिद मजिद कुरेशी, ज. सेक्रेटरी नियाज अहमद कुरेशी, कार्याध्यक्ष अकबर हनीफ पटेल, सल्लागार हाजी नासिर कुरेशी, हाजी शादाब कुरेशी ,हाजी शरीफ कुरेशी यासह पुणे शहरातील कुरेशी समाजाचे प्रमुख मान्यवर व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.