मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा
पुणे : मेट्रोने उत्सव काळात चांगल्या प्रकारे सेवा दिली त्यामुळे पुण्याबाहेरील नागरिकांना देखील उत्सवात सहभागी होता आले. गणेश उत्सवाच्या दहा दिवसात ४० लाख भाविकांनी मेट्रोच्या प्रवासाचा लाभ घेतला तसेच गणेश विसर्जन च्या दिवशी सहा लाख गणेश भक्त मेट्रो ने पुण्याच्या मध्यभागात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते मेट्रोच्या रात्रभर या सेवेमुळे भाविकांना पुण्याच्या मध्यभागी यायला सोयीस्कर झाले या सेवेची दखल घेऊन श्री तुळशीबाग मंडळांनी मेट्रोचे मोटरमन आणि अधिकारी कर्मचारी यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. या सोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान देखील महत्वाचे आहे. कार्यकर्ते देखील समर्पित भावनेने उत्सवात काम करतात. तुळशीबाग गणपती मंडळातर्फे पुण्याचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर नेणाऱ्यांचा हा कृतज्ञता सन्मान आहे, असे प्रतिपादन आमदार हेमंत रासने यांनी केले.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा येथील पुरगस्त गावातील महिला भगिनींसाठी ६०० साड्या देण्यात आल्या. यावेळी राजेंद्र बांठिया, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते. अग्निशामक दलातील अधिकारी, जीवरक्षक आणि मेट्रोचे मोटरमन तसेच कर्मचारी आणि उत्सवातील पडद्यामागील व्यक्तींचा कृतज्ञता सन्मान यावेळी करण्यात आला.
नितीन पंडित म्हणाले, गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून पुण्याची परंपरा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे. दरवर्षी लाखो भाविक पुण्यात येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतात. या उत्सवाला यशस्वी करण्यासाठी जितका जल्लोष, उत्साह दिसतो, तितकीच पडद्यामागे अनेकांची निःस्वार्थ मेहनत, समर्पण आणि सेवाभाव असतो, यासाठी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान मंडळातर्फे दरवर्षी करण्यात येतो.

