पुणे दि.१५: मकर संक्रांत सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या विविध वस्तू विक्रीसाठी वस्तू उपलब्ध असून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कारागृह महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांचे संकल्पनेतुन व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, यांचे मार्गदर्शनाखाली “मकर संक्रांत” सणानिमित्त कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनिल एन ढमाळ यांचे हस्ते करण्यात आले.
“सुधारणा व पुनर्वसन” हे कारागृह विभागाचे ब्रीद असुन कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक
असतो. त्यामुळे निश्चितच त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात व त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार बंद्यांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर विक्री केंद्रामार्फत बंदी निर्मित वस्तुंची विक्री करण्यात येते. विविध सणांचे औचित्य साधुन बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मकार संक्रांत सणानिमित्त यावर्षी बंद्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
विक्री मेळावा व प्रदर्शनामध्ये बंद्यांनी सागवान लाकडापासुन तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तु, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट, तीळाच्या वड्या, हलव्याचे दागिने, पतंग तसेच इतर सर्व दैनंदीन वापराच्या वस्तु उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या प्रदर्शन व विक्री मेळाव्यास सामान्य नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सामान्य नागरीकांना अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या कारागृह बंदी निर्मित विविध वस्तु उपलब्ध असुन त्याचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन , अधीक्षक सुनिल एन ढमाळ यांनी या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान केले.
सदर कार्यक्रमासउपअधीक्षक, श्री बी. एन. ढोले, उपअधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक मंगेश जगताप, आनंदा कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी,. एस. एम. पाडुळे, कारखाना व्यवस्थापक,. सी. आर. सांगळे, काराखाना तुरुंगाधिकारी, येरवडा मध्यवर्ती कारागृह व इतर अधिकारी / तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.