पुणे-भारतीय हवामान विभागाने पुढील दाेन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ विभागात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात ढगाळ वातावरण राहील. सकाळी काही ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरूशकतो. पण तो अति मुसळधार स्वरूपात पडल्यास शेती तंत्र आणि सिंचन व्यवस्थेत अडथळे येऊ शकतात. मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचे मराठवाड्यामध्ये मंगळवार व बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहील आणि दुपारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर बुधवारी मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, कोकण विभागात विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पुढील ३–४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. सोमवारी संध्याकाळनंतर काही भागांत ताशी ३०–५० किमी वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.
सोमवारी रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहील. यात कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस राहणार आहे.
पश्चिम बंगाल व परिसरात हवेची द्रोणीय स्थिती राहणार असल्याने २६ जूनपासून देशाच्या मध्य भागासह महाराष्ट्रातही पाऊस वाढणार आल्याचे हवामान तज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.