पुणे-कुख्यात गुंड शरद मोहोळ याने २०१२मध्ये नामदेव कानगुडे, विठ्ठल गांडले यांना मारहाण केली होती. त्याचा बदला ११ वर्षांनंतर कानगुडे, गांडले यांचा भाचा साहिल पोळेकर घेत ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी घेतला. त्यानेच गोळीबार करून मोहोळचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. २०१० ते २०१२ कालावधीत पोळेकरच्या दोन्ही मामांनी मोहोळच्या मावस भावाला एका प्रकरणात मारहाण केली. त्यानंतर मोहोळने या दोघांना बदडून काढले. नंतर तो सतत त्यांचा अपमान करत होता. एका व्यवहारातील पैसेही कानगुडेंना परत करण्यास मोहोळने नकार दिला. म्हणून पोळेकरने त्याचा काटा काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार पोळेकर यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राबाहेरून पिस्तूल आणले. त्यानंतर तो मोहोळशी गोड बोलून, येता – जाता पाया पडून त्याच्या टोळीत विश्वास मिळवून सामील झाला. आणि त्याने मोहोळच्या हालचालींबाबत त्याच्या साथीदारांना वेळोवेळी माहिती पुरवणे सुरू केले. मोहोळ नेमका कुठे कधी जातो, त्याच्यासोबत कोण कोण असते, याचा पूर्ण अभ्यास झाल्यावर त्याने हल्ल्याचा कट रचला. खून केल्यावर आरोपी एका दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर पुढे जाऊन दुचाकी सोडून देत कात्रजला रिक्षाने गेले. तेथे साहिलच्या मामाने चारचाकी पाठवली होती. त्यातून ते कोल्हापूरकडे पसार होण्याच्या मार्गावर होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲड. रवींद्र वसंतराव पवार (४०, रा. नांदेगाव, ता. मुळशी), ॲड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी काॅलनी, कोथरुड) हे शिवाजीनगर न्यायालयात कार्यरत वकील कात्रजपासून आरोपींसोबत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
सीसीटीव्ही, इन्स्टाग्रामुळे तत्काळ सापडले
तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले, मोहोळवरील हल्ला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. साहिलने इन्स्टाग्रामवर ‘मी येरवड्यात जाणार’ असे रिल तसेच फरार होण्यासाठी वापरलेल्या चारचाकीचा क्रमांक टाकला होता. तो क्रमांक आम्ही चेकनाका पथकांना दिला होता. साहिल, नामदेव, विठ्ठल यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.
६ जणांना ५, तर २ वकिलांना ३ दिवस कोठडी
मोहोळ खून प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, ता. मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, ता. मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड), ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांना २४ तासात अटक झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्यासमोर त्यांना शनिवारी सकाळच्या सत्रात हजर करण्यात आले. तेव्हा सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत तर दोन वकिलांना आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एक आरोपी वकील न्यायालयात रडले
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात दोन वकिलांना अटक झाल्याने बार असोसिएशन वकिलांनी सुनावणीस गर्दी केली होती. न्यायाधीशांच्या सूचनेवरून बार असोसिएशन अध्यक्षांनी हस्तक्षेप वकिलांना न्याय दालनाबाहेर काढले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत आरोपी ॲड. रवींद्र पवार ढसाढसा रडले. आरोपींनी संपर्क केल्यानंतर पोलिसांना शरण जाण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली होती, असा दावा त्यांनी केला.
सल्ला देत असताना वकिलांना पकडले
ॲड. निंबाळकर यांनी आरोपी वकिलांतर्फे असा युक्तिवाद केला की, साहिल, नामदेव हे यापूर्वीच्या गुन्ह्यात त्यांचे पक्षकार आहेत. त्यांना या प्रकरणात सल्ला देत असताना, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वकिलांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केलेली नाही. कोथरुड पोलिस ठाण्यातील कदम नामक एका जुन्या पोलिस उपनिरीक्षकांना आरोपींच्या शरणागतीची माहिती दिली होती. कोणत्याही वकिलाला पक्षकारास सल्ला देण्याचा अधिकार आहे.

