पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील पुणे-नगर रस्ता ते लोहगाव-वाघोली रस्त्याला फॉरेस्ट पार्क, गोठण ओढा मार्गे जोडणाऱ्या स. नं. १५५ मधील केवळ ३०० मीटर लांबीचा रस्ता गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिकेला आठ दिवसांची मुदत देत हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, पुणे मनपा आवारात नागरिकांसह आमरण उपोषण करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना दिलेल्या निवेदनात बापूसाहेब पठारे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, की या महत्त्वाच्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला असतानाही मनपा प्रशासनाने अद्याप ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
“जर येत्या २ मे पर्यंत हा रस्ता पूर्ण करून नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला नाही, तर मला पुणे महानगरपालिका आवारात असंख्य नागरिकांसमवेत आमरण उपोषण सुरू करावे लागेल,” असे पठारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. उपोषणामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. निवेदनाची प्रत महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस उपआयुक्त हिंमत जाधव तसेच विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आली आहे.
सदर प्रलंबित रस्त्याच्या कामाबाबत आता पुणे मनपाची भूमिका काय असेल व पुढील काही दिवसात नागरिकांच्या अपेक्षांची तसेच आमदार पठारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची पूर्तता होते का, याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.