अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्यावतीने आयोजन : सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबत नववर्षाच्या स्वागताकरिता आणि वेंकीज उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदमेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन
पुणे : गणपती बाप्पाच्या पायापासून ते त्याच्या फेट्यापर्यंत तयार केलेली अत्यंत सुबक शाडू मातीची मूर्ती… गणपतीचे पाय, त्याचे मोठे पोट, त्याची लांब सोंड, सुपासारखे कान, झुबकेदार फेटा, त्याचे रेखीव दागिने बघण्यात बालचमू रमून गेले. गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक मुलांनी पाहिले. त्याचबरोबर डान्स, गाण्याचे सादरीकरण, हातावर काढलेले रंगीबेरंगी टॅटू आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत बालचमूंनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत केले.
निमित्त होते, अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबत नववर्षाचे स्वागत करीत आणि वेंकीज उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त बुरूड आळी येथील म्हसोबा मंदिर येथे आयोजित आनंदमेळावा व स्नेहभोजनाचे. आनंद मेळ्यात मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांनी मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, पुणे शहरचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, माजी नगरसेवक प्रविण चोरबेले, वसंत मोरे, उद्योजक पृथ्वीराज भिंताडे, सारिका निंबाळकर, तेजस्विनी थिटे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. वंचित विकास संस्थेतील चिमुकल्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तब्बल ४०० जणांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
रवींद्र गायकवाड म्हणाले, लहान मुलांचे कार्यक्रम असेल तर आम्ही तो चुकवत नाही. कारण मुलांना पोलिसांचे त्यांच्या युनिफाॅर्मचे आकर्षण असते. पोलिसांना बघून त्यांना प्रोत्साहन मिळते. पोलीस हे मुलांसमोर आदर्श असतात, असे ही त्यांनी सांगितले.
प्रवीणकुमार पाटील म्हणाले, गरजवंतांपर्यंत पोहोचून योग्य व्यक्तीची मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम ही संस्था करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जावून त्यांच्या समसया ओळखून तुम्ही योग मदत पोहचविता हे कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवृत्ती जाधव म्हणाले, ट्रस्टच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. परंतु दरवर्षी निराधार चिमुकल्यांसोबत आनंद मेळावा स्नेहभोजन करण्याचा उपक्रम राबवित सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. प्रत्येकाची आनंद साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. परंतु आपण आपल्यासोबत समाजातील गरजू आणि निराधार घटकांचा विचार करायला हवा. सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच चांगले संकल्प मनाशी ठेऊन आपण नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
आनंद मेळाव्यात रमत बालचमूंनी दिला सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत
Date:

