जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल तर्फे अभियानाचे आयोजन
पुणे : व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे…शराब पीना छोड दो, अपना जीवन मोड दो…नशे से दोस्ती, जीवन से मुक्ती… हम सबका है यही सपना, नशामुक्त हो देश अपना… अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला. व्यसनमुक्त भारताकरिता दारु सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीय, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, राहुल यादव, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर, भुपेंद्र मोरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
संस्थेतील महिला शिक्षिका व विद्यार्थीनींनी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल न-हे येथे, इंद्रप्रस्थ क्रान्तीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला. उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष होते.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम आवश्यक आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाची युवापिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

