पुणे-आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष अंग झटकून तयारीला लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे नमूद केले. तसेच विरोधी पक्ष आक्रमकपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे संकेत दिले.प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका राहील. आम्ही सर्वांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीलाी सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. त्यावर अनौपचारिकपणे शिक्कामोर्तबही झाला आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे. ही घोषणा पुढील 8-10 दिवसांत होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सोमवारी याविषयी बोलताना सांगितले आहे.
महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे दिल्लीतील बैठकीत होते. दिल्लीत त्यावेळी वरिष्ठ नेते होते, लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला निश्चित झालेला असून अधिकृत शिक्कामोर्तब व्हायचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात आहे, राज्यावर अन्याय होत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्यं सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्या राज्याच्या पुढे गेली आहेत.महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. या सरकारला २०० आमदारांचं पाठबळ असलं तरी विकास त्या वेगात होताना दिसत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. पाणी प्रश्न, अतिवृष्टी आणि दुष्काळ हे आव्हान राज्य आणि देशासमोर आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सायबर क्राइमचे विषय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारनं १५ दिवसांपूर्वी नवे कायदे मंजूर करुन घेतले त्यात फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलं आहे, असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे 3 मोठे पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे. पुढील काही दिवसांत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा यात समावेश होऊ शकतो. तूर्त या आघाडीला मविआत समाविष्ट करण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे.

