पुणे-वेगवेगळ्या भागात बेटिंग , ऑनलाईन जुगार ,यासह बेक्यादा धंद्यात पोलिसांची असलेली भागीदारी , किंवा पोलिसच चालवीत असलेले गैरधंदे यांचा पर्दाफाश कधी होणार ? असा प्रश्न सातत्याने पोलीस वर्तुळातील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत उपस्थित होत आला आहे. पण आता जणू ती वेळ आली आहे असे काहींना वाटू लागले आहे. त्याला निमित्त घडले आहे बारा सिलेंडरच्या स्फोटाचे …विमानतळ भागात गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा असलेल्या गोदामात बुधवारी दुपारी स्फोट झाला. एकापाठोपाठ बारा सिलिंडरचे स्फोट झाले. या गंभीर घटनेची पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी तत्काळ दखल घेत अपर पोलीस आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित गोदाम एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने सुरू होते. तसेच संबंधित व्यक्ती नेहमी पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाऱ्यास भेटत असल्याची माहिती समोर आली आहे.
विमाननगरमधील सिंबायोसिस कॉलेजजवळ एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे जवळच मजुरांची वसाहत आहे. त्या परिसरात एका गोदामात बेकायदा गॅस सिलिंडरचा मोठा साठा होता. बुधवारी तेथे आग लागली आणि एकापाठोपाठ बारा सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरा हादरला. याची झळ मजुरांच्या झोपड्यांना पोहोचली. त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले.
अग्निशमन दलातील ३० जवानांनी गोदामात साठवलेले तब्बल १०० सिलिंडर बाहेर काढले. वसाहतीतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावले. या घटनेमुळे गॅसचा काळाबाजार समोर आला असून या प्रकरणाची आता अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात काहीजण बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करत आहे. घरगुती, तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर जादा दराने विक्री करत असून, पत्र्याचे शेडमध्ये बेकायदा सिलिंडरचा साठा करुन ठेवत आहेत. बेकायदा सिलिंडर साठवणूक करण्यात आलेल्या गोदामांना आग लागल्याची घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.
स्थानिक पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होण्याचे कारण काय ?
इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा करून त्याची वाहतूक, विक्री सुरू असताना स्थानिक पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला नाही का ? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक विचारत आहेत. या प्रकरामुळे स्थानिक पोलिसांची यंत्रणा अपयशी ठरली आहे. घटनेत सुदैवाने जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
“गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणाचा तपास सुरू असून, जागा मालकास अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याचा चालक अद्याप सापडला नाही. तो सापडल्यानंतर तो कोणत्या एजन्सीकडून सिलिंडर घेत होता हे समजले. त्याप्रमाणे संबंधित एजन्सीवरही कारवाई करण्यात येईल.” – आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ

